पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
साहित्याच्या माध्यमातून समाजाला नवे विचार, नव्या दिशा देणाऱ्या पंढरपूरच्या सुपुत्राचा आज सन्मान झाला, तोही अत्यंत प्रतिष्ठेच्या राजर्षी शाहू साहित्य पुरस्काराने!
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (शाखा बार्शी) यांच्यावतीने देण्यात येणारा प्राचार्य व. न. इंगळे पुरस्कृत "राजर्षी शाहू साहित्य पुरस्कार" यंदा पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावचे प्रतिभावान युवा साहित्यिक अंकुश गाजरे यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाहक सुनिताराजे पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या पुरस्काराने यापूर्वी प्रा. डॉ. महेंद्र कदम, इतिहासतज्ज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे, साहित्यिक डॉ. राजेंद्र दास आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासारख्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे, हीच परंपरा या पुरस्काराने यंदाही पुढे चालवली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीपा सावळे होत्या. शिवशक्ती अर्बन को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, सतीश अंधारे, ज्येष्ठ साहित्यिक यांचेही मंचावर उपस्थितीने कार्यक्रम अधिक भारदस्त झाला.
या वेळी प्रमुख पाहुण्या सुनिताराजे पवार यांनी मनोगतातून गाजरे यांचा गौरव करताना म्हटलं,"अंकुशचा आवाज भारदस्त आहे, विचार प्रगल्भ आहेत. असा प्रतिभावान लेखक उजेडात आणण्याचे भाग्य या पुरस्काराला लाभले आहे. अशा लेखकाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सत्रात स्थान देता येईल."
लेखक अंकुश गाजरे यांचे अनवाणी, सारीपाट, गावमातीतली माणसं, चांदण्यातली अमावस्या, सुंदर सुविचार, कथा सोलापूरी ही साहित्यकृती समाजमनाला स्पर्शून गेली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या आत्मकथनात्मक "अनवाणी" या पुस्तकाचा कोकणी भाषेत अनुवाद झाला असून, या पुस्तकाने अनेक वाचकांच्या मनात घर केलं आहे.
या आधीही त्यांना विविध सामाजिक-सांस्कृतिक संस्था, साहित्य परिषदांनी गौरवले आहे. त्यांचं लेखन हे समाजाभिमुख, वास्तववादी आणि आशयसंपन्न असल्यामुळे आजच्या काळातील नव्या पिढीचा सशक्त प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव घेतलं जात आहे.
या पुरस्कारप्रसंगी बार्शी परिसरातील अनेक साहित्यप्रेमी, मान्यवर, वाचक उपस्थित होते. लेखक अंकुश गाजरे यांना या मान्यतेबद्दल साहित्यविश्वातून मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.