पंढरपूर, प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा माथाडी मंडळातील कर्मचार्यांची संख्या सध्या कमी झाली असून त्या जागेवर माथाडी हमाल, कामगार, तोलारांच्या मुला-मुलींना किंवा पाल्यास रिक्त पदावर कंत्राटी व करार पध्दतीने नेमणूक करण्यात यावी. त्याची प्रसिद्धी जिल्ह्यातील वृत्तपत्रांत द्यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी माथाडी बोर्डाचे चेअरमन सुधीर गायकवाड यांच्याकडे केली आहे.
सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समितीची सोमवार दि. 23 जून रोजी सोलापूर येथील माथाडी बोर्डाच्या हॉलमध्ये माथाडी बोर्डाचे चेअरमन तथा सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजिवी कामगार समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी या बैठकीमध्ये जिल्ह्यातील हमाल, तोलार कामगारांच्या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नोंदीत कामगारांच्या संख्येत घट होत असल्याने नवीन हमाल व तोलार कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. बोगस नोंदणी थांबविण्यात यावी. माथाडी बोर्डाच्या निरिक्षकाने प्रत्येक केंद्रास भेट द्यावी. हमाल, तोलार कामगारांचे पगार वेळेत व्हावेत. माथाडी बोर्डात पगार न भरणार्या मालक, आडत्या व दुकानदार तसेच कामगारांवरही कारवाई करण्यात यावी. माथाडी बोर्डातील पगारपत्रक वर्षाअखेरच कामगारांना देण्यात यावे. त्यामुळे त्यांचा फंड किती जमा होतो हे दिसून येईल, अशा विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर माथाडी बोर्डातील रिक्त झालेल्या जागेवर माथाडी कायदा 1969 च्या कलमात व त्या अंतर्गत असलेल्या योजना 1988 (सुधारित 1992) या योजनेच्या तरतुदीमध्ये उल्लेख केलेल्या अधिकाराचा वापर करून माथाडी मंडळाचे चेअरमन तथा सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर यांनी एक सदस्यीय मंडळ म्हणून रिक्त असलेल्या 9 पदांवर माथाडी मंडळ सोलापूर येथे नोंदीत असलेल्या व धर्मा मंडळाकडून बँकेमार्फत वेतन घेणार्या माथाडी, हमाल, तोलार कामगारांच्या मुला-मुलीस अथवा पाल्यास रिक्त पदावर कंत्राटी व करार पध्दतीने नेमणूक करण्यात यावी, ही प्रमुख मागणी करून सध्या कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गातून किंवा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्याच्या कुटुंबातून स्वतः निवृत्त कर्मचार्यांचा मुलगा, मुलगी, पती-पत्नी अथवा नातेवाईक यांच्यातून माथाडी मंडळात रिक्त झालेल्या कोणत्याही पदावर परस्पर तसेच कंत्राटी पध्दतीने बाह्य यंत्रणेकडून, एजन्सीकडून नियुक्ती अथवा नेमणूक करण्यात येवू नये. उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-2017/प्र. क्र. 93/कामगार-8, मंत्रालय, मुंबई, दि. 31-10-2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
तसेच प्रशासकीय निधी खर्च 5 टक्क्यांऐवजी 3 टक्के करण्यात यावा व नोंदीत, कार्यरत माथाडी हमाल, तोलार कामगारांच्या माहे मे 2025 या महिन्याच्या एकूण वेतनातून 10 टक्केऐवजी 12 टक्केप्रमाणे कामगार भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी बोर्डाचे चेअरमन सुधीर गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी माथाडी बोर्डाचे निरिक्षक मिलिंद सलगर, सुधीर जुमनाळकर, प्रमोद माने, समन्वय समितीचे जिल्हा उपाध्यक्ष भिमा सिताफळे, गोरख जगताप, जिल्हा सचिव संतोष सावंत, शिवानंद पुजारी, चांदा गफार, वालचंद रोडगे, चंद्रकांत मांजरे, हरिभाऊ कोळी, नागन्नाथ खंडागळे, सिध्दू हिप्परगी, दत्ता मुरुमकर, प्रकाश उपासे, सिध्देश्वर ढोले, नवनाथ सुरवसे, ताजुद्दीन शेख, सुनीता रोटे, लक्ष्मण तिर्थकर, सिध्दाराम बिराजदार, अशोक चुंगेकर, संदिप कांबळे, किरण मस्के, हरि गायकवाड, मुरगेप्पा धनुरे, शिवानंद जमादार, तिप्पया गुत्तेदार आदी उपस्थित होते.
कामगारांना न्याय देण्यासाठी कटिबध्द
सोलापूर जिल्हा माथाडी मंडळामार्फत माथाडी बोर्डाचा चेअरमन म्हणून सर्व हमाल, तोलार कामगारांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत ही प्रामुख्याने केली असून यापुढेही करणार आहे. आज दिलेल्या निवेदनावर मी विचार विनिमय करून जेवढे शक्य होईल तेवढे या विषयास अनुसरून सर्वांना न्याय देण्याचे काम करणार आहे. जेथे अडचण येईल तेथे आपण सर्वांनी एकत्र येवून यावर मार्ग काढू. कामगारांच्या प्रत्येक मागण्या मांडल्या आहेत त्या सर्व मागण्या सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे.
सुधीर गायकवाडसहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी बोर्डाचे चेअरमन