73 कोटी 25 लाख 64 हजार रुपयांची तडजोड शुल्क वसूल
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज नंदकुमार देशपांडे
पंढरपूर तालुका विधी सेवा समितीच्यावतीने जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे दि.10 मे 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 877 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण 73 कोटी 25 लाख 64 हजार 902 रुपयांची तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांनी दिली.
राष्ट्रीय लोकअदालतीत 5 वर्षावरील 797 जुनी प्रकरणे निकाली काढण्यात असून, या लोकअदालतीसाठी एकुण 7 पॅनलची व 1 नियमित न्यायालयाची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश एस बी देसाई, न्यायाधीश ए. ए. खंडाळे, न्यायाधीश श्रीमती एस.एस. पाखले, न्यायाधीश श्रीमती एस.एस.राऊळ, न्यायाधीश एन.एस बुद्रुक, न्यायाधीश श्रीमती के.जे.खोमणे, न्यायाधीश पी.पी बागुल व न्यायाधीश श्रीमती पी.आर पाटील यांनी काम पाहिले.
सदरची लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. त्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश श्री. डी. एन. सुरवसे, सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. खंडाळे, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.एस. पाखले यांनी वेळोवेळी बैठका घेवुन, पाठपुरावा करुन संपन्न केली.
या लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व पक्षकार न्यालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.