पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
भागवत धर्म व वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज व परिवाराच्या 675 वा संजीवन समाधी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी समस्त शिंपी समाजाची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. 4 मे रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर संत नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली.
येथील प्रदक्षिणा मार्गावरील संत नामदेव महाराज मंदिरात (जन्मस्थान) रविवारी सकाळी 9 ते दुपारी 5 वाजेपर्यंत संत नामदेव महाराजांचे 16 वे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
संत शिरोमणी नामदेव व त्यांच्या परिवारातील 15 सदस्यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा यावर्षी जुलै महिन्यात असून दि. 23 व 24 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये समस्त नामदास महाराज परिवार, पंढरपूर शिंपी समाज, अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघ, श्री केशवराज संस्थान, संत नामदेव महाराज वारकरी-फडकरी संघटना, संत नामदेव युवक संघटना, महिला भजनी मंडळ तसेच महाराष्ट्रातील समस्त शिंपी समाज, व सहयोगी संस्थांच्या अनमोल सहकार्याने या संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी रविवार दि. 4 मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिंपी समाजातील विविध संस्था, संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी महाराष्ट्रातील समस्त शिंपी समाजातील सर्व पोट जातीतील संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकार्यांनी सदर बैठकीस उपस्थित रहावे. या बैठकीमध्ये 675 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध समित्यांची घोषणा करण्यात येणार आहे. ज्या समाज बंधू, भगिनी, युवक कार्यकर्त्यांना या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांनीही बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन नामदास महाराज परिवार व आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.