पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थी पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. अनिल निकम, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. समीर कटेकर, पालक प्रतिनिधी श्री. दशरथ सांगोलकर व श्री. सुरेश पाटील यांचे हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. अनिल निकम यांनी पालक मेळाव्याच्या आयोजनाचे उद्दिष्ठ स्पष्ट केले. तसेच विद्यापीठाच्या परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला. यावेळी त्यांनी नमूद केले कि पंढरपूर सिंहगड चे ८ विद्यार्थी हे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या १० मध्ये आलेले आहेत. त्याचप्रमाणे एकूण १९ विद्यार्थ्यांनी १०/१० ग्रेड पॉईंट मिळविले आहेत. तसेच या वेळी विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावरील राष्ट्रीय कार्यक्रम (NPTEL) अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत एकूण ३३५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याची माहिती दिली. यामध्ये तीन विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळविले आहे तसेच ७५ विद्यार्थ्यांनी रौप्य पदक मिळविले आहे. पुढे बोलताना त्यांनी पालकांना आवाहन केले कि त्यांनी आपला पाल्य कॉलेजमध्ये असताना काय करत असतो हे त्यांनी कॉलेजमध्ये भेट देऊन पाहावे.
पालकांना मार्गदर्शन करताना उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्याचा विद्यार्थ्यांना होणारा फायदा स्पष्ट केला. कॉलेजचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. समीर कटेकर यांनी विद्यार्थ्यांना कॉलेजकडून उपलब्ध दिल्या जाणाऱ्या नोकरीच्या संधींबद्दल माहिती दिली.
आपले मनोगत व्यक्त करताना पालक प्रतिनिधी श्री. सुरेश पाटील यांनी सर्व पालकांना आवाहन केले कि आपण जरी कामात व्यस्त असाल तरी आपल्या पाल्यासाठी आपण वेळ काढून त्याच्या भविष्याबद्दल मित्रत्वाच्या नात्याने चर्चा केली पाहिजे. आपण जे कष्ट करत आहोत ते आपल्या पुढच्या पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी असते म्हणून आपल्या पाल्याशी हितगुज करून आपण कॉलेजच्या साथीने त्यांचे भविष्य चांगले घडवू शकतो. शेवटी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पालकांनी त्यांच्या सूचना मांडल्या व प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पालकांच्या सूचनांचा विचार करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांची भारतीय ज्ञान परंपरा प्रतिकृती स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला. तसेच प्रथम वर्षातील स्वप्नजा काळे, वेदिका डुबल, प्रतीक फुंडे, वैशाली चव्हाण, आयमान बेदरेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी पवार व सृष्टी अरकिले यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी पवार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथम वर्ष विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.