सर्व सामान्यांचा आवाज बनून काम करणे हि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी - सुरज चव्हाण
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सर्व सामान्यांचा आवाज बनून काम करणे हि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असून पद भेटल्यानंतर लोकांची कामे करणे हे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले. पंढरपूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने आयोजित अजित पर्व युवा जोडो अभियान युवा संवाद मेळावा व पंढरपूर तालुक्यातील स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे होते.
या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष राकेश कामटे, प्रदेश उपाध्यक्ष संग्राम पाटील, कार्यालयीन सचिव अमर पाटील, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, शहर अध्यक्ष दिगंबर सुडके, तालुकाअध्यक्ष अनिल नागटिळक, युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आवाड, कार्याध्यक्ष अक्षय भांड, शहर अध्यक्ष अमोल परबतराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुरज चव्हाण म्हणाले की, शासन व प्रशासन यांनी एकत्रित समन्यवयाने काम करीत सर्व सामान्य जनतेला केंद्र बिंदू मानून पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कामाचा आदर्श डोळयासमोर ठेवून पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांनी काम करुन सामान्य लोकांच्या जीवनात आनंद आणावा असे सांगून सोलापूर जिल्हयातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त पक्ष सदस्य नोंदणी साठी प्रयत्न करावे असे सांगीतले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले की, तरुण युवा कार्यकर्ता हा पक्ष संघटनेतील महत्वाचा घटन असून संघटनेच्या माध्यमातून गावातील वाडी वस्तीवर पक्षाचे ध्येय धोरणे प्रभावीपणे राबवावी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची ओळख कामाचा आपला माणुस म्हणून महाराष्ट्रात आहे तोच आदर्श आपल्यासमोर असून आपण ही कामाच्या माध्यमातून युवक संघटना मजबुत करावी असे काळे यांनी सांगीतले.
यावेळी विभागीय अध्यक्ष, राकेश कामटे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांची समायोचित भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाचे संयोजक प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी केले सुत्रसंचालन प्रा.एस.एस.काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश गुरव यांनी मानले. या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्यने उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पुन्हा नव्याने उभा करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही मोहिम राबवित असून सदस्य नोंदणीच्या माध्यमातून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी एकत्रित कामाला सुरुवात केली आहे. स्पर्धा परिक्षतेत यशस्वी झालेले तालुक्यातील गुणवंतांनी आपल्या गावखेडयातील माणसे न विसरता सामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी काम करावे यासाठी तुमचा सत्कार आज आयोजित केला असल्याचे सांगीतले.