पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात भारताचे थोर वैज्ञानिक भारतरत्न सी. व्ही. रमण यांच्या रमण प्रभाव या शोधाच्या उत्पत्तीचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी तांदुळवाडी येथील प्रा. अशोक चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला वंदन करून झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी महाविद्यालयाच्या वतीने प्रा. अशोक चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी महाविद्यालयाचे प्रकाशन अधिष्ठाता डॉ. संपत देशमुख यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. अशोक चव्हाण यांनी सी. व्ही. रमण यांच्या रमण प्रभाव या शोधासंबंधी रोचक माहिती विद्यार्थ्यांना दिली, तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले कि जसे सी. व्ही. रमण यांनी वयाच्या ८३ वर्षापर्यंत स्वतःला संशोधनात वाहून घेतले होते तसेच विद्यार्थ्यांनीही स्वतःला आपला समाज घडवण्यामध्ये वाहून घेतले पाहीजे.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव सुरवसे व प्रीती चौगुले यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन डॉ. दिपक गानमोटे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अद्विक क्लबचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.