पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि बिदर (कर्नाटक) मधील गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) अंतर्गत दि.२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान आठवडाभर शिक्षक विकास कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.
गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ. सरदार बलबीर सिंगजी व स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. ‘द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स’ या विषयावर या कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा हायब्रिड मोडमध्ये आयोजित केली होती. या कार्यशाळेत महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील जवळपास १४० हून अधिक संशोधक, प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे प्रायोजक इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) बॉम्बे सेक्शन हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) बॉम्बे सेक्शनचे अध्यक्ष आनंद घारपूरे आणि सहायक प्राध्यापक डॉ. सुक्रुती कौलगुड यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. या कार्यशाळेतून शैक्षणिक उत्कृष्टता साधण्यासाठी योगदान, शैक्षणिक ज्ञान व व्यावहारिक उपयोग यामध्ये असलेली दरी भरून काढण्यावर अधिक भर दिला गेला. या कार्यशाळेचे आयोजन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
पहिला दिवशी कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (डीबीआयटी), मुंबई चे प्राचार्य डॉ. सुधाकर मांडे यांनी ‘भारताच्या सेमीकंडक्टर उद्योगाचा उदय’ या विषयावर महत्वपूर्ण माहिती दिली. दुसऱ्या दिवशी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) च्या एपीएस-इडीएस च्या अध्यक्षा आणि आणि फ्र. कोंसिसाओ रोड्रिग्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मुंबई च्या प्रा. डॉ. स्वप्नाली आशिष माकडेय यांनी ‘व्हीएलएसआय डिझाईनमधील मशीन लर्निंगची भूमिका’ या विषयावर व्याख्यान दिले. तिसऱ्या दिवशी हैद्राबाद मधील मारी लक्ष्मण रेड्डी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंटचे के. मणिकांता यांनी 'सेन्सर' या विषयावर संवादात्मक कार्यशाळा घेतली. चौथ्या दिवशी दोन महत्वाची सत्रे आयोजित केली होती. यामध्ये पहिल्या सत्रात व्हीआयपीटी-एपी विद्यापीठ अमरावती (एपी) यांनी ‘सीएमओएस व्हीएलएसआय’ सर्किट्समधील लीकेज कमी करण्याच्या तंत्रांवर’ मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात व्हीएनआयटी, नागपूरचे डॉ. गणेश पाटील यांनी ‘नॅनोस्केल डिव्हायसेसचा भूतकाळ, वर्तमान व भविष्य’ यावर एक विस्तृत व्याख्यान दिले. पाचव्या दिवशी पुन्हा दोन अतिरिक्त सत्रे आयोजित केली होती त्यात पहिल्या सत्रात मणिपूर (इम्फाळ) च्या एनआयटी मधील डॉ. मनोज जोशी यांनी ‘लो पॉवर व्हीएलएसआय डिझाईन’ या विषयावर मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात याच महाविद्यालयातील डॉ. वांगखैरकपम वंदना देवी यांनी ‘सेन्सर्समधील प्रगती’ या विषयावर व्याख्यान दिले. सहाव्या दिवसी रेखा चंद्रराव याच्या ‘कृपा वेलनेस अँड फिटनेस सेंटर’ मार्फत ‘शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगासने’ करून घेतले. यावेळी समारोप प्रसंगी सहभागी प्राध्यापकांनी या कार्यशाळेचे अनुभव सांगितले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
या कार्यशाळेतील विशेषज्ञ सत्रे, कार्यशाळा आणि संवादात्मक चर्चांमध्ये सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आणि ए.आय. क्षेत्रातील चालू ट्रेंड्सवर चर्चा करण्यात आली. हायब्रिड मोडमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे सहभागींना ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष उपस्थित होण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, डॉ. वीरेंद्र डाकुलगी आणि डॉ. किशन सिंग यांनी केले तर यासाठी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंतर्गत असलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
डॉ. नीता कुलकर्णी आणि प्रा. रजनी पटेल यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुमंत आनंद यांनी आभार मानले.