बाल चमुंनीं केली एक लाख वीस हजारांची उलाढाल..
शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
आजकाल स्पर्धेच्या युगात विद्यार्थी हा परीक्षा केंद्री होत चालला असून,व्यवहार ज्ञानाचा अभाव त्यांच्यामध्ये दिसून येत असताना दुसऱ्या बाजूला सनराईज पब्लिक स्कूल,शेळवे सारखी प्रशाला विद्यार्थ्यांमध्ये दैनंदिन व्यवहार,कला,क्रीडा, वक्तृत्व,व्यक्तिमत्त्व विकास या सारखे संस्कार विद्यार्थ्यांवर करताना दिसून येत आहे, एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही प्रत्यक्ष अनुभव मिळालेला नसतो.बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच,परंतु याची प्रत्यक्ष अनुभूती सनराईज पब्लिक स्कूल मधील मुलांना प्रत्यक्ष बाजार भरवून देण्यात आली.
प्रथम "आनंदी बाजार डे" चे उद्घाटन गावातील जेष्ठ ग्रामस्थ गणपत गाजरे, गजेंद्र पवार व महिला प्रतिनिधी सौ. विमल गाजरे, सौ. लताबाई गाजरे, सौ.शालन गाजरे, तसेच प्रशालेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष श्री समाधान गाजरे,प्रशालेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे व संस्थापक सचिव श्री अंकुश गाजरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुलांनी विविध प्रकारचे १६० स्टॉल लावले,त्यामध्ये भाजीपाला स्टॉल,फळांचा स्टॉल,चहा स्टॉल,किराणा स्टॉल,विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच कोणी शालेय वस्तूंचे स्टॉल तर कोणी कपड्यांचे स्टॉल,खेळण्यांचे स्टॉल तर चक्क सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा स्टॉल सुद्धा लावलेला होता.विद्यार्थ्यांना बाजारात होणारी आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.उत्पादन खर्च,खरेदी किंमत,नफा तोटा,विक्रेते व गिऱ्हाईक यांच्यात पैशावरून होणारी घासाघीस,तसेच लोकांची गर्दी यांचा अनुभव घेता आला.विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.सर्वांनी बाजार डे चा आनंद मनसोक्त लुटला.बाजार डे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
परिसरातील असंख्य ग्राहक विद्यार्थ्यांना अनुभवता आले,यानिमित्ताने एक वेगळी अनुभूती विद्यार्थ्यांना आली,आजच्या या विशिष्ट दिवशी विद्यार्थ्यांच्या हातातून तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचा व्यवहार फिरला,विद्यार्थ्यांना उन्हातान्हात उभा राहून राबणाऱ्या आपल्या आई बापाच्या कष्टाची जाणीव झाली,प्रत्येक स्टॉल धारक विद्यार्थ्यांनी आपण आणलेला माल,त्यासाठी आलेला खर्च,माल विकण्यासाठी केलेली कसरत,विक्री किंमत,झालेला नफा किंवा तोटा,याची माहिती प्रशालेस दिली,सदर बाजारात ग्राहक म्हणून प्रशालेस नियमित सहकार्य करणारे पालक,माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
त्यामध्ये श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ नाईकनवरे,सिद्धेश्वर बंडगर,शेळवे गावचे उपसरपंच किरण गाजरे,खेड भाळवणी गावचे उपसरपंच प्रतिनिधी शहाजी पाटील,भंडी शेगाव चे सरपंच गणेश पाटील,खेड भाळवणी गावचे ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब पवार,जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त सैनिक गजेंद्र पवार, तसेच पालक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सर्व ग्राहक,पालक यांनी प्रशालेच्या या उपक्रमाचे कौतूक केले,व मुलांच्या कडून भरपूर खरेदी करून त्यांना प्रेरणा दिली..