सुमारे 1800 अधिकारी, स्वयंसेवक - कर्मचाऱ्यांची नियुक्ती,
दर्शनरांग द्रुतगतीने चालवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कार्तिकी एकादशी मंगळवार, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आहे. या यात्रेला अंदाजे 8 ते 10 लाख वारकरी भाविक येतात. कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक व मुबलक सोयी-सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर व चहा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
भाविकांचे लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी दर्शनरांग जलद व द्रुतगतीने चालविणे कामी आवश्यक त्या उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा बंद ठेवणे, महत्वाच्या व अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या थेट दर्शनावर निर्बंध, ऑनलाइन दर्शन बुकिंग पास बंद ठेवणे, दर्शन रांगेत भक्तांची संख्या मोजणीचा कॅमेरा, घुसखोरी करणाऱ्या वर गुन्हा दाखल करणे व अनुभवी व प्रशिक्षित कमांडोजची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, पंरपंरेनुसार श्रींचा पलंग काढल्याने दैनंदिन 24 तास मुखदर्शन व 22 तास पदस्पर्शदर्शन उपलब्ध होत आहे.
तसेच या यात्रा कालावधीतील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत असून, श्रींचा पलंग काढणे, एकादशीच्या सर्व पुजा, महानैवेद्य, श्रींच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वार काला व प्रक्षाळपुजेचे योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय, आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्थेकामी, सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचा-यासह, सिझफायर यंत्रणा, स्कायवॉकवर आपत्कालीन गेट व फोनची व्यवस्था, चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक 118 सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सुचना प्रणाली, चौकशी कक्ष, बँग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलीसी, मॅन काउंटिंग मशीन इ. व्यवस्था करण्यात आली आहे.
देणगी घेण्यासाठी जादा 20 स्टॉलची निर्मिती व ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, RTGS ची सुविधा, सोने-चांदी वस्तु दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच नगरप्रदक्षिणा, दर्शनरांग, मंदिर प्रदक्षिणा, चंद्रभागा वाळवंट इ. पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील ठिकाणची स्वच्छता देखील मंदिर समिती मार्फत करण्यात येत आहेत. या कामी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येत आहे.
वैद्यकीय व्यवस्थेच्या दृष्टीने मंदिर परिसरामध्ये दोन अद्ययावत रूग्णवाहिका वैद्यकीय पथकासह, मंदिर समिती मार्फत श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे प्रथमोपचार केंद्र, वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांचेमार्फत मंदिराच्या माळवदावर भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून येणार आहे. तसेच दर्शनरांगेत शासनाच्या आरोग्य विभागामार्फत दर्शनमंडप व पत्राशेड येथे आयसीयु, बाजीराव पडसाळी, सारडा भवन इत्यादी ठिकाणी आरोग्य व्यवस्था असणार आहे.
महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष व चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहेत, चेंजिंग रूम चे ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला कमांडोची नियुक्ती करण्यात येत आहे.
श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व त्यासाठी पश्चिमद्वार, उत्तरद्वार व्यतिरिक्त श्री संत तुकाराम भवन येथे नवीन स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच दर्शनरांगेत शाबुदाणा / तांदळाची खिचडी व चहा तसेच मागील वर्षाप्रमाणे 4 दिवस पत्राशेड येथे 24 तास मोफत भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. या सर्व नियोजनासाठी सुमारे 1800 अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.