स्वेरीत ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे उदघाटन
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘अन्न, वस्त्र आणि निवारा या बाबी माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. तंत्रज्ञानाच्या उपयोगाने या गोष्टी अधिकाधिक उत्तम व दर्जेदार केल्या जात आहेत. वाढत्या लोकसंख्येला निवारा देण्याचे कार्य ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’ करत असते. हा निवारा अथवा कोणतेही बांधकाम मजबूत होण्यासाठी सर्व प्रथम त्याचा पाया भक्कम हवा तेंव्हाच दर्जेदार बांधकाम हे उभे राहू शकते.’ असे प्रतिपादन डॉ.वागीशा मथडा यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने ‘इनोव्हेटिव्ह टेक्निक्स इन ग्राउंड इम्प्रुव्हमेंट अँड सॉईल रेनफोर्समेंट फॉर सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर’ या विषयावर काल सोमवार (दि.११ नोव्हेंबर) ते शनिवार, दि.१६ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान आठवडाभर ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (एफडीपी)’ चे आयोजन केले आहे. याच्या उदघाटन प्रसंगी डॉ. वागीशा मथडा हे प्रमुख मार्गदर्शन करत होते.
दीप प्रज्वलनानंतर प्रास्ताविकामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांनी ‘१९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरीचा या सव्वीस वर्षांच्या कालावधीतील शैक्षणिक चढता आलेख सांगितला. श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या नावामध्येच रिसर्च (संशोधन) असल्यामुळे या महाविद्यालयात अधिकाधिक संशोधन होत असल्याचे स्पष्ट केले. तसेच संशोधनासाठी आत्तापर्यंत आलेल्या निधीबाबत सविस्तर माहिती दिली.
या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख डॉ.एस.पी. पाटील व प्रा. ए.बी. कोकरे यांनी संपूर्ण विभागाची माहिती देऊन सहा दिवस चालणाऱ्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम च्या माध्यमातून येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांबद्दल माहिती दिली. डॉ.एम.जी. देशमुख यांनी सिव्हील इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तयार होणारे रस्ते, बांधकाम, इमारती मधील विटा, माती, स्टील, डांबर यांचा दर्जा कसा असावा? हे स्पष्ट करून सध्याच्या बदलत्या काळात कार्यात गुणवत्ता येण्यासाठी जिओटेक्निकल मध्ये आणखी बदल होत असल्याचे सांगितले.
सॉईल सुधारणा टेक्निक्स वर पुढे बोलताना प्रमुख पाहुणे डॉ.मथडा म्हणाले की, ‘रस्त्याच्या कामात माती, खडी, डांबर आदी संबंधित साहित्यांचे प्रमाण ठरलेले असताना केवळ अतिरिक्त फायद्यापोटी कार्यात निकृष्ट दर्जा देणे हे सिव्हील इंजिनिअरिंग क्षेत्राचा अवमान ठरेल.’ असे सांगून त्यांनी व्हर्टिकल ड्रेन, डीप सॉईल मिक्सिंग, जेट ग्रायंडिंग, सॉईल व्हेट्रीफिकेशन, कॉम्पक्शन पाईल्स असे आदी संबंधित बाबी सांगून बायोपॉलीमर स्टॅबीलायझेशन प्रोसेस व त्या संबंधी वेगवेगळे बायोपॉलीमर्स या बद्दल माहिती देवून त्याचे फायदे, पर्यावरणावर होणारा परिणाम, त्याच्या त्रुटी याबद्दल माहिती दिली. या सहा दिवस चालणाऱ्या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू येथील संशोधक प्राध्यापक ऑनलाईन व ऑफलाईन सहभागी झाले आहेत.
यावेळी सिव्हील इंजिनिअरींग विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रुती गणचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होते प्रा.पी.जी.सिद्धम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.सी.आर. अभंगराव ह्या एफडीपी चे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.