गणेश हिरवे जोगेश्वरी प्रतिनिधी तेज न्यूज
मागील ३६ वर्षे अखंडित आणि प्रामाणिकपणे शैक्षणिक कार्य करणाऱ्या आदर्श मुख्याध्यापिका स्नेहा संजय सुभेदार यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षातील बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा मानाचा सर्वोच्च असा *" महापौर पुरस्कार "* जाहीर करण्यात आला आहे.
यावर्षी मनपा शाळा व खाजगी अनुदानित शाळांतील एकूण १५८ शिक्षक/मुख्याध्यापक यांनी महापौर पुरस्कारासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी मनपाचे ३८ व खाजगी शाळांचे १२ शिक्षक अशा एकूण ५० शिक्षकांची मनपाकडून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून लवकरच महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा महापौर पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करून या सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक/मुख्याध्यापक यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
सन -१९८८ पासून घाटकोपर येथील शिशु विकास प्राथमिक विद्यालयात आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात करणाऱ्या सौ. स्नेहा संजय सुभेदार यांनी ३६ वर्षे या विद्यालयात प्रामाणिकपणे, निष्ठेने कार्य करीत आहेत. शिक्षक म्हणून 27 वर्षे आणि मुख्याध्यापक म्हणून 8 वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व शाळेच्या उन्नतीसाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.
सौ.स्नेहा संजय सुभेदार ह्या प्रामाणिक असून उत्तम तंत्रस्नेही शिक्षक आहेत. त्यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य अतिशय उत्तम आहे. मनाने प्रेमळ, समंजस, सुस्वभावी, शांत , संयमी व हसतमुख आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांची अचूक जाण असून त्यासाठी ते सतत झटत असतात. N.S.T विभागात त्यांचे विशेष वर्चस्व आहे. समन्वयक म्हणूनही त्यांचे कार्य उत्कृष्ट आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे.
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्याशी त्यांचे नाते आदराचे व आपुलकीचे असून समाजात त्यांना फारच आदराचे स्थान आहे.
अशा आदर्श मुख्याध्यापिकेला महापौर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समस्त शिक्षक व कर्मचारी वर्गातून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.