पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी चर्चा सत्राचे आयोजन केले होते. ‘परदेशातील पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजिलेल्या दोन दिवशीय कार्यशाळेत दादर-मुंबई येथील ‘ई-प्लॅनेट इंटरनॅशनल’ या कंपनीचे ऑस्ट्रेलिया स्थित असलेले कंपनीचे संचालक सदानंद मोरे हे बहुमोल मार्गदर्शन करत होते.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन दिवसीय चर्चासत्र पार पडले. प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा.ए.ए. मोटे यांनी हे दोन दिवशीय चर्चासत्र आयोजित करण्यामागील हेतू स्पष्ट केला. ‘अभियांत्रिकी व फार्मसी मधून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हे परदेशातील पदव्युत्तर शिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या संधी शोधत असतात. ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, न्यूझीलंड, इंग्लंड अशा विविध देशांमध्ये अशा संधी मिळविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ई-प्लेंनेट इंटरनॅशनलच्या माध्यमातून अनेक प्रवेश परीक्षा व प्रक्रिया, विजा, परदेशातील शिष्यवृत्ती, राहण्याची सुविधा या संदर्भात विशेष मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेताना असणारे नियम व मार्गदर्शक तत्वे यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. परदेशात भारतीय विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक व व्यावसायिक संधीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. पुढे विद्यार्थ्यांनी परदेशातील शिक्षणाबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या विशेष प्रयत्नातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे अधिकारी संगीता ढसाळ, रुपा कनोजिया, स्वप्नील ढसाळ, तन्मय सरकार, स्वेरीचे संशोधन अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

