सुरत प्रतिनिधी तेज न्यूज
संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहेत. विविध पक्षांकडून प्रचाराला जोर दिला जात आहे. तसेच प्रचारातील रंगत आता वाढत आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान अलीकडेच पूर्ण झाले. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या शुक्रवारी होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मतदान चार दिवसांवर आलेले असतानाच भाजपासाठी मोठी खूशखबर आली आहे. गुजरातमधील एका उमेदवाराचा विजय निश्चित झाला असून निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणाच बाकी राहिली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्याच उमेदवाराचा एकमेव अर्ज उरल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट आहे. गुजरातमधील सुरत मतदारसंघामध्ये भाजपाचा विजय निश्चित झाला आहे.
या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपाला देशातील पहिला विजय गुजरातमध्ये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे चार जून आधीच भाजपाच्या पारड्यात एक जागा पडली आहे.