सहा लक्ष बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती; - कार्यकारी अधिकारी राजेन्द्र शेळके
पंढरपूर प्रतिनिधी
भेटी लागी जीवा, लागलीस आस… असं म्हणत माघी यात्रेच्या निमित्ताने वारकरी भाविक दर्शन रांगेत गर्दी करत आहेत. या वारकरी भाविकांना श्रीचा प्रसाद म्हणून तांदळाची / साबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात येत आहे, खिचडी बरोबर चहा व मिनरल वॉटर देखील देण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
आज दिनांक 19 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता दर्शन रांगेत खिचडी वाटपाचा शुभारंभ मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके व विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. तसेच पत्रा शेड येथील अन्नछत्रांमध्ये आज पुरी भाजी चे वाटप करण्यात येत आहे.
प्रसाद घेऊन वारकरी भाविक कृतज्ञता व्यक्त करीत होते. दर्शनासाठी आलेल्या भक्ताच्या मुखात प्रसाद रूपी दोन घास पडावे व कोणीही उपाशी जावू नये याची मंदिर समितीने खबरदारी घेतली आहे.
संपूर्ण दर्शन रांगेवर ऊन, वारा, पावसापासून संरक्षणासाठी आच्छादन, स्पिकरवर अभंग आणि भक्तीगीते, सतर्क सुरक्षा यंत्रणेमुळे दर्शनरांग दृतगतीने चालून भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळत असून आपत्कालीन व्यवस्थापन, पायाला खडे टोचू नये म्हणून म्याटिंग, कुलर - फॅन, विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, लाईव्ह दर्शन, सूचना फलक, सॅनिटरी नॅपकिन, आपत्कालिन मदत कक्ष, सीसीटीव्ही, आरोग्य, अन्नछत्र इत्यादी आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
याशिवाय, भाविकांना बुंदी लाडू प्रसाद अल्प देणगी मूल्य आकारून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी दर्शन मंडप, उत्तर द्वार, पश्चिम द्वार या ठिकाणी स्टॉल उभा करण्यात आले असून, एमटीडीसी भक्त निवास येथे अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात येत आहे, याची जबाबदारी विभाग प्रमुख श्री पृथ्वीराज राऊत यांचेकडे आहे, यात्रेच्या अनुषंगाने सहा लक्ष लाडू प्रसादाची उपलब्धी होत असून, दर्शन घेतल्यानंतर भाविक लाडू प्रसाद घेण्यासाठी गर्दी करत असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल याचे नियोजन करण्यात आले आहे.