पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था, पंढरपूर संस्थेच्या वतीने ‘शिवजयंती’ निमित्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व इनरव्हील क्लब पंढरपूरच्या वतीने बसविलेल्या ‘ओपन जिम’चा लोकार्पण सोहळा योगभवन, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते आणि दै. पंढरी संचार संस्थापक संपादक, जेष्ठ पत्रकार आदरणीय ह.भ.प. बाळासाहेब बडवे यांचे अध्यक्षतेखाली, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, सीमाताई परिचारक, माजी नगराध्यक्ष व पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, माजी उपनगराध्यक्ष व पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन माधुरीताई जोशी, मीरा प्रशांत जाधव, माजी नगरसेवक मनोज सुरवसे, गुरुदास अभ्यंकर, विवेक परदेशी, सामजिक कार्यकर्ते अमोल डोके, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे सचिव श्री प्रशांत आगावणे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष अँड. सुनिल वाळूजकर यांनी, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या जागेमध्ये नागरिकांना योगा अभ्यास करता यावा म्हणून सर्व स्तरातील योग साधक यांना एकत्रित करून स्वखर्चाने व नगरपरिषदेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या योगभवनची माहिती सांगितली. सन २००७ मध्ये संस्थापक अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेल्या छोट्या रोपट्याचे आज त्याचे एका कल्पवृक्षात रुपांतर झाले आहे. आज योगभवन हे नुसते योगभवन न राहता या योगभवनच्या हॉलमध्ये सकाळी पुरुषांसाठी ६:३० ते ८ तर महिलांसाठी दुपारी ४ ते ६ या वेळेत योगाभ्यास केला जातो. तसेच संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत लहान-मोठ्या मुलामुलींसाठी कराटे प्रशिक्षण व सांस्कृतिक भवनमध्ये डान्सिंग अकॅडमी सुरू केल्याचे सांगितले. हे इन डोअर गेम सुरू असले तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी व इतर नागरिकांसाठी एक ओपन जिम असावी म्हणून शहरात अतिशय चांगले काम करत असलेल्या इनरव्हील क्लब यांच्याकडे ओपन जिम बसविण्याबाबत संकल्पना मांडली होती, त्यानुसार इनरव्हील क्लब अध्यक्षा अनुराधा हरिदास व सचिवा अमृता आराध्ये यांनी पुढाकार घेऊन त्याची पूर्तता केली असल्याची माहिती दिली.
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अनुराधा हरिदास यांनी इनरव्हील क्लब ही जागतिक संस्था असून देशात व जागतिक पातळीवर काम करते व शहरात अनेक प्रकल्प या संस्थेच्या माध्यमातून राबविण्याल्याची माहिती या निमित्ताने दिली. मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी नगरपरिषदेने हा ओपन स्पेस श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था यांना विकसित करण्यासाठी दिला होता तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापर करून कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता, स्वखर्चाने योगभवन व सांस्कृतीक हॉल बांधून या ठिकाणी विविध सांस्कृतिक उपक्रम चालवत असल्याचे पाहून अतिशय समाधान व्यक्त केलं व नगरपरिषदेच्या वतीने अजून काही सहकार्य लागल्यास ते निश्चितपणाने करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार ह.भ.प. बाळासाहेब बडवे यांनी आपल्या शुभाशीर्वादामध्ये सदर संस्था कोणताही जात-भेद, पक्ष-पात न करता शहरातील नागरिकांची सुदृढ आरोग्यासाठी चांगली सेवा देत आहे याचे कौतुक केले व पंढरपूर शहरांमध्ये अतिशय चांगली काम करत असलेली एकमेव संस्था म्हणजे ही श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था असल्याचे सांगितले. सौ. सीमाताई परिचारक यांनी महिलांसाठी वेगळा योगवर्ग सुरु केल्याबद्दल संस्थेचे धन्यवाद व्यक्त केले.
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, समाजकार्याची आवड असली की त्यामध्ये राजकारण न आणता सुद्धा समाजोपयोगी काम करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्था आहे. २००७ पासून ही संस्था पंढरपूर शहरातील नागरिकांना योगाभ्यास व इतर सामाजिक उपक्रम राबवीत आहे या जागेमध्ये पूर्वी घाणीची साम्राज्य व सर्वत्र काटेरी झाडे झुडपे होती. परंतु संस्थेने स्वतःच्या खर्चातून ही जागा विकसित करून नागरिकांना चांगली व्यायामाची सोय उपलब्ध करून दिली आहे. आणि आता याच जागेत योगाभ्यास, कराटे प्रशिक्षण, डान्स अकॅडमी, झुंबा डान्स चालवत असताना इनरव्हील क्लबच्या माध्यमातून ओपन जिमचा हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे त्याबद्दल इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा, सचिवा व सर्व महिला सदस्यांची आभार व्यक्त केले. त्याचबरोबर हा आदर्श इतर संस्थांनीही घ्यावा असे सांगून शहरातील सर्व ओपन स्पेस अशा रीतीने विकसित होण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेकडे पंढरपूरातील कौटुंबिक एकोपा म्हणून पाहीले जाते असे त्यांनी नमूद केले .
यावेळी ज्योती शेटे (योग शिक्षका), महेश गावडे (कराटे परीक्षक), संदीप सूर्यवंशी (डान्स टीचर), आर बी जाधव (आर्किटेक्ट), पवनकुमार झंवर (झुम्बा टीचर) नगर अभियंता नेताजी पवार यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी शरद वाघमारे नागनाथ तोडकर मर्चंट बँकेचे संचालक संजय जवंजाळ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेचे अध्यक्ष सुनील वाळूजकर, उपाध्यक्ष रवींद्र कोडग, सचिव प्रशांत आगावणे, खजिनदार त्रिभुवन तारे, अँड. रामलिंग कोष्टी, गजेंद्र माने, निसार शेख, डॉ दीपक अचलारे, प्रवीण घोटगे, अमोल कौलवार, जयंत हरिदास, कांतीलाल सुपेकर, श्रीकांत पेंडाल आणि सर्व योगसाधक व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अनुराधा हरिदास, सचिवा अमृता आराध्ये व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए पवनकुमार झंवर यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धेश्वर कोरे यांनी केले. सदर कार्यक्रमाला श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था परिवार आणि इनरव्हील क्लब पंढरपूर कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.