पंढरपूर डाक विभागासारखे उत्कृष्ठ काम इतर डाक विभागाने करावे
पंढरपूर प्रतिनिधी
पोस्टाच्या विविध योजना सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे उत्कृष्ठ काम पंढऱपूर डाक विभागाने केलेले आहे. त्यामुळे या डाक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे अभिनंदनास पात्र आहेत. पंढरपूर डाक विभागासारखेच उत्कृष्ठ काम इतर ठिकाणच्या डाक विभागाकडून देखील अपेक्षीत आहे. नागरिकांसाठी पोस्टाच्या विविध योजना सुरु असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे रिजनचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी केले.
अधीक्षक डाकघर पंढरपूर यांच्या तर्फे विविध उपक्रम, विविध प्रकारच्या कार्यशाळा आणि कर्मचारी सन्मान सोहळ्याचे पंढरपूर अर्बँन बँकेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे रिजनचे पोस्टमास्तर जनरल श्री जायभाये बोलत होते. यावेळी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे पुणे रिजनचे चीफ मँनेजर रोहितकुमार बर्नवाल, पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक चंद्रकांत भोर, इंडिया पोस्ट पेमेंट बँक मँनेजर विनायक पासंगराव, प्रणव परिचारक, तसेच डाक विभागातील अधिकारी, कर्मचारी व पोस्टमास्तर उपस्थित होते.
यावेळी पुणे क्षेत्राचे पोस्टमास्तर रामचंद्र जायभाये यांनी डाक विभागाच्या महिला सन्मान बचत योजना, सुकन्या समृध्दी योजना, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स, पोस्टाच्या मुदत ठेव योजना, मासिक प्राप्ती योजना, आधार सेवा, जनरल इन्शुरन्स, प्रिमियम खाते, मर्चंट खाते, अंन्त्योदय श्रमिक सुरक्षा योजना आदी विविध योजनांची माहिती आणि त्यांचे फायदे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजनेत २८९ रुपयांमध्ये पाच लाख रकमेचा आणि ४९९ रुपयांमध्ये दहा लाख रुपये रकमेचा अपघाती विमा आणि इतर फायदे यामध्ये लाभार्थ्यास मिळणार असल्याची माहितीही श्री. जायभाये यांनी दिली.
केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंढरपूर डाक विभागाकडून थेट त्यांच्या बांधावर जावून आपल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँके मार्फत पैसे दिले जात असल्याची अभिमानास्पद कामगिरी केली जात असल्याची माहिती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे पुणे रिजनचे चीफ मँनेजर रोहितकुमार बर्नवाल यांनी यावेळी दिली.
प्रारंभी पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक चंद्रकांत भोर यांनी पंढरपूर विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी वेळापूर येथील डाकसेवक अनंत क्षीरसागर आणि पुरंदावडे येथील पोस्टमास्तर प्रदीप वाघमोडे या दोघांनी जनरल इन्शुरन्स आणि पोस्टाच्या बचत योजना मध्ये केलेल्या विशेष कामगिरी बद्दल त्यांचा रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डाक विभागाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देवुन गौरविण्यात आले.
यावेळी मुख्यालयातील सहाय्यक अधीक्षक एम.एम.पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आलेल्या कार्यशाळेत प्रिव्हेन्शन आँफ फ्राँड या विषयावर तर गीताजंली उपाध्याय यांनी साँफ्ट स्कील या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसुमती वाले आणि आनंद जगताप यांनी केले. पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक चंद्रकांत भोर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी मुख्यालयातील सहाय्यक अधीक्षक एम.एम.पाटील, उत्तर उपविभागाचे सहाय्यक अधीक्षक राजकुमार घायाळ, करमाळा येथील उपविभागीय डाक निरीक्षक नदीक शेख, मंगळवेढा येथील डाक निरीक्षक हाजिरा शेख आणि अधीक्षक कार्यालय व पंढरपूर मुख्यालया मधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.