नवी मुंबई प्रतिनिधी सुभाष हांडे देशमुख
कामगारांना व्यासपीठ देऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारा नाट्य महोत्सव हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कोल्हापूरमध्ये मागील तीन वर्षापासून सुरु असणारी ही विभागीय स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. कामगार कलावंतांना या निमित्ताने कलेची सेवा करता येते, असे उद्गगार आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी प्रसंगी व्यक्त केले. त्या केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६९ व्या नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी पुणे विभागाचे सहा. कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ रंगकर्मी शरद भुताडिया हे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या हौशी नाट्य स्पर्धेपेक्षाही सात वर्ष जुनी असणारी ही स्पर्धा आहे याबाबत आनंद व्यक्त करुन कष्टकरी समूहाला आपल्या भावभावना व्यक्त करता येणे ही जमेची बाजू आहे. असे मत त्यांनी मनोगतात व्यक्त केले.
प्रमुख उपस्थितीत असणारे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी मंडळाच्या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटूंबियांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीकरीता केले जाणारे प्रयत्न हे उल्लेखनीय असून, इतर जिल्ह्यांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना मंडळाच्या विविध उपक्रमांचा लाभ मिळावा यासाठी, कोल्हापुरात कामगार भवन निर्माण व्हायला हवे तसेच मंडळाचे कल्याण आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कामगाराभिमुख व नाविण्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सदर स्पर्धेमध्ये पुणे विभागा अंतर्गत - पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या ५ जिल्हयातील नाट्य कलावंत सादर करणार आहेत. यामध्ये विजेता संघ राज्य पातळीवर निवडला जाणार आहे.
यावेळी स्पर्धा परीक्षक नरहर कुलकर्णी, रविदर्शन कुलकर्णी, मदन दंडगे हे जेष्ठ रंगकर्मी उपस्थित होते. जिल्ह्यातील गुणवंत कामगार, रंगकर्मी, पत्रकार, इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नाटकाची तिसरी घंटा वाजवून करण्यात आले. ही स्पर्धा २ ते २५ जानेवारी सायंकाळी ७ वाजता असणार आहे. सर्वांना प्रवेश मोफत असणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केले. तर पाहुण्यांचे आभार कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी तर निवेदन केंद्र संचालक सचिन आवळेकर यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर स्पर्धेतील पहिले नाटक "युगे युगे शहामृगे" सादर झाले.
कार्यक्रम आयोजनात चंद्रकांत घारगे, सचिन खराडे, दिपक गावराखे, संघसेन जगतकर, सचिन शिंगाडे, विजय खराडे, अशोक कौलगी, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.