पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा फार्मसीमध्ये प्रथम आणि द्वितीय वर्ष फार्मसीतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली व स्वेरी संचलित डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालक मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सिद्धेश्वर भुई हे लाभले, पालक प्रतिनिधी म्हणून अनिल कदम तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. शारदा शिंदे हया उपस्थित होत्या.
सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे पालक या मेळाव्यात सहभागी झाले होते. प्रास्तविकात प्रा. सौरभ कौलगी यांनी डी.फार्मसीची माहिती दिली. यामध्ये महाविद्यालयात उपलब्ध सोयी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, रात्र अभ्यासिका वर्ग, तसेच शिक्षणासाठी संबंधित महत्वाच्या बाबी सांगितल्या. होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना, सोलार रुफ टाफ पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, जिमखाना, वाचनालयात उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी संदर्भ पुस्तके, वसतिगृहातील सुविधा, वाहतुकीसाठी बस सुविधा, १०२४ एम.बी.पी.एस. क्षमतेची वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम तसेच औषधांची निर्मिती कशी होते हे पाहण्यासाठी थेट इंडस्ट्रीयल व्हिजीट आदी फार्मसीशी निगडीत आवश्यक सुविधांची सविस्तर माहिती दिली. प्राचार्य प्रा.सतीश मांडवे यांनी विद्यार्थ्यानी मोबाइलचा वापर कमीत कमी करून अभ्यासावर अधिकाधिक लक्ष देण्याचे आवाहन केले. तर पालकांनी पाल्याच्या हितासाठी वर्ग शिक्षक विषय शिक्षक, प्रात्यक्षिक शिक्षक, वसतिगृह अधीक्षक यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून पाल्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यावी. कारण पाल्यांचा जागृतपणा हा पाल्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत असतो.’ असे सांगून महाविद्यालयाच्या वाटचाली संबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी अनेक पालकांनी काही प्रश्न मांडले. यावेळी प्राचार्य प्रा. मांडवे यांनी जागेवरच काही प्रश्न सोडविले तर काही प्रश्न वरिष्ठ पातळीवर सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी सुमारे २०० पालक उपस्थित होते.