विशेष लेख
एक अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराजांच्या लीला
सद्गुरू श्री शंकर महाराज हे थोर अवलिया होते हे नव्याने सांगायची गरज नाही. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंब्यकेश्वर येथील पुजारी कै रामभाऊ अकोलकर यांना शंकर महाराजांचा सहवास लाभला. शंकर महाराज हे रामभाऊंचे दैवत बनले होते. रामभाऊंच्या घरी शंकर महाराज राहत असत. त्यांच्या वाड्यात महाराजांची मूर्ती आणि फोटो आहे पण बऱ्याच भक्तांना आजही त्याठिकानी गेल्यावर सिगारेटचा वास येतो.
महाराजांच्या अनेक भक्तांची जन्म आणि मृत्यूची तारीख १३ आहे. महाराजांना १३ हा अंक विशेष प्रिय आहे. याचा अर्थ सांगताना महाराज सांगत असत; "सब कुछ तेरा, कुछ नही मेरा" हे जीवन व तुझे सारे ऋणानुबंध तुझेच आहेत. तू तुझ्या मागील जन्माचा कर्मभोग घेऊन आला आहेस. तो तुला भोगलाच पाहिजे. कर्मभोगातून मोकळा झाल्याशिवाय तुला ईश्वर प्राप्ती होणार नाही."
महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक आणि महाराजांचे निस्सीम भक्त कै. प्र. के. अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूपूर्वी महाराजांनी त्यांच्या दारावर १३ वेळा थाप मारून त्यांना मृत्यूची चाहूल दिली होती. त्यांना १३ जून १९६९ रोजी देवाज्ञा झाली आणि ते महाराजांच्या चरणी विलीन झाले. पाथर्डीच्या माधवनाथ बाबाना समाधीनंतर ५४ वर्षानंतर पावागडचा डोंगर चढताना महाराज भेटले. त्यांनी माधवनाथांना पाच हॉटेलमध्ये चहा पाजला. प्रत्येक वेळी हॉटेलचे बिल १३ रुपये झाले. हॉटेलचे बिल देताना महाराज १०० ची नोट देत असत पण उरलेले पैसे परत घेत नसत.
सदगुरूनाथा योगिराजा भवसागरी तू धाव !
शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा !!
हे भगवंता दीनदयाळा शरण मी आलो तुला !
शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा !!
श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना सद्गुरुचा महिमा सांगत असत
योगिराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत. तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत रहात. संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. त्यांच्या सोबत शुभराय मठाचे महंत जनार्दन बुवा व जानुबुवा असत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय