पंढरपूर प्रतिनिधी
गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गावरुन पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव आनंदी आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हे पथसंचलन करण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांचे पथसंचलन झाले. सांगोला चौकापासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. संत पेठ, कालिका देवी चौक, महाव्दार चौक, तांबडा मारुती, गोविंदपुरा, पंढरपूर अर्बन बँक चौक, भोसले चौकासह शहर पोलीस स्टेशनपर्यंत पथसंचलन करण्यात आले.
या पथसंचलनामध्ये पंढरपूर पोलीस ठाण्याचे ४ पोलीस अधिकारी, ५० पोलीस अंमलदार, केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी, २० होमगार्ड यांचा समावेश होता. पथसंचालनाच्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याकडे लाठी, ढाल, हेल्मेट, रायफल आदीसह पंढरपूर पोलीस ठाण्याची तीन वाहने सहभागी झाली होती.