सोलापूर प्रतिनिधी
परसबाग सोलापूरची या पर्यावरणीय व्यासपीठाच्या देशी वृक्ष संवर्धन या उपक्रमांतर्गत शहरातील वेगवेगळ्या भागातील श्रीकृष्ण मंदिर परिसरामध्ये देशी वृक्ष रोपण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
विजापूर रस्ता परिसरातील श्री द्वारकाधीश मंदिराच्या प्रांगणात द्वारकाधीश मंदिर संस्थेच्या विश्वस्ता सौ.भारतीबेन पटेल, परसबाग सोलापूरची चे श्री.नारायण पाटील,श्री.योगेश जक्कल,सौ.इंदिरा भोस यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या वैजयंती या झाडाचे श्रावण मासारंभी पारंपारिक पध्दतीने रोपण करण्यात आले. मंदिराचे व्यवस्थापक श्री.दत्तात्रय पाठक,सौ.लता पाठक यांनी यासाठी मनोभावे सहकार्य केले.
परसबागच्यावतीनें देशी वृक्ष संवर्धन या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील श्रीकृष्ण मंदिरामध्ये वैजयंती आणि कदंब यासह विविध देशी वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. वैजयंतीचे रोपण हा या उपक्रमाचा प्रारंभ आहे. याचबरोबर लाल चिंच,लाल हादगा,ताम्हण,सीता अशोक,पांढरा कवठी चाफा,पांढरा सोनचाफा, बारमाही हंगामाचा कोकणचा सुगंधराज वेलणकर सोनचाफा ,
शमी,बकुळ,केवडा,वटवृक्ष,पिंपळ,उंबर,शिवण,पिंडाला,पळस या सारख्या अनेक वृक्षांचे रोपण पालकत्व पध्दतीनें करण्यात येणार आहे.परसबाग सोलापूरची च्या संकल्पनेतून शहराच्या विशिष्ट भागांमध्ये कदंब वृक्षांचे मोठ्या प्रमाणात रोपण करण्यात येणार आहे.

