पुणे प्रतिनिधी संजय गायकवाड
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदणी चौकाची वाहतूक कोंडीच्या संकटातून मुक्त करण्याचा ठाम निश्चय घेतल्यानंतर बरोबर वर्षभरात नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. शनिवारी, १२ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले आणि गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी, गर्दीमुळे घुसमटणाऱ्या या चौकाने मोकळा श्वास घेतला.
चांदणी चौक वाहतूक कोंडीमुक्त करण्याचे काम सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. त्यासाठी अनेक उड्डाणपूल आणि अंडरपास प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षापर्यंत या कामात फारशी प्रगती झाली नव्हती. मुंबई बेंगळुरू महामार्गावर ९० च्या दशकात बांधण्यात आलेला पूल हे या कामातील विलंबाचे प्रमुख कारण होते. त्याचबरोबर या प्रकल्पासाठी भूसंपादन हीदेखील गुंतागुंतीची बाब होती.
याचदरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जात असताना चांदणी चौकाच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकले. त्यांनी सतत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत असल्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांना पाहिले. मुख्यमंत्र्यांचा ताफा पाहिल्यानंतर काही नागरिकांनी त्यांच्याकडे जाऊन गर्दीमुळे रोजचा मौल्यवान वेळ कसा वाया जातो, हे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. प्रलंबित प्रकल्पाचा तपशील मागवला आणि काही दिवसांतच त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची थेट कामाच्या ठिकाणी बैठक घेतली. चांदणी चौकातील कामात ९० च्या दशकात बांधण्यात आलेला बावधन ते पौडला जोडणारा पूल हाच मोठा अडथळा ठरत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. या पुलामुळे राष्ट्रीय महामार्ग अरुंद झाला होता आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ तज्ज्ञांची मदत घेऊन पूल पाडण्याच्या सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयने नोएडा येथील एडिफिस इंजिनीअरिंग या एजन्सीची नियुक्ती केली. या कंपनीने नोएडामधील ट्विन टॉवर पाडण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी दोन ऑक्टोबर रोजी हा पूल पाडण्यात आला आणि अंडरपास व उड्डाणपूल विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला. आज इथल्या पुलाचे उद्घाटन झाले. अखेर चांदणी चौकाची मुक्तता झाली.