भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील वाखरी जवळील चंद्रभागा दूध डेरी जवळ टेम्पो व चार चाकी टमटम यांची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला. तर दोघे जखमी झाले आहे. जखमीवर पंढरपूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी चार वाजता घडला. पंढरपूर होऊन म्हसवड कडे निघालेला टेम्पो एम एच ११ टी ६०६२ आणि पंढरपूर कडे जाणाऱ्या टमटम एम एच १३ डी क्यू ३४४२ या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये टमटम चालक सचिन गुंडाप्पा भोसले (वय ४० रा. भाळवणी) याला जोरदार धडक बसल्यामुळे तो जागीच ठार झाला. तर टेम्पो मधील दोघेजण गंभीर जखमी झाले.
मयत सचिन भोसले हा भाळवणी येथील रहिवासी असून बँकेतील कर्ज काढून टमटम घेतले होते.यामधून तो भाजीपाल्याची वाहतूक करीत असे. त्याला एक मुलगा व एक मुलगी असून त्याच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी मुले,पत्नी असा परिवार आहे. घटनास्थळी परीक्षार्थी पोलीस निरीक्षक रोहिणी बनकर यांनी भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे भाळवणी परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.