पंढरपूर प्रतिनिधी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा नियमांचे संदेश देणारे बँड व विठ्ठल भक्तांना देवदूत असे संबोधित करणारे बॅच तसेच रस्ता सुरक्षा नियमाचे महत्त्व पटवून देणारी अभंगपर अमृतवाणी यांचे प्रकाशन महसूल, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पंढरपूर येथे करण्यात आले. यावेळी खासदार रणजीत नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे आदि उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अमृता देशमुख यांनी बँड, बॅच तसेच अमृतवाणीचे संकलन केले असून, हा उपक्रम जनहितार्थ राबवण्यात येत आहे.
याबाबत अर्चना गायकवाड म्हणाल्या, रस्ता सुरक्षेचा संदेश देणारे बँड जास्तीत जास्त वारकरी वर्गामध्ये पोहोचवून त्यांच्यामध्ये रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे, त्यांना देवदूत असे संबोधित करणाऱ्या बॅचमधून त्यांनी वारीतून परतल्यानंतर त्यांच्या माध्यमातून अजूनही इतर लोकांपर्यंत रस्ता सुरक्षा नियमांचा प्रचार करण्यास मदत करावी, तसेच रस्ता सुरक्षा व विठ्ठल भक्ती दोन्हींची सांगड घालून अभंगपर अमृतवाणी वारकऱ्यांकडून गाऊन घेऊन या माध्यमातूनही रस्ता सुरक्षेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न असल्याची त्या म्हणाल्या.