जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर
जोगेश्वरी (पुर्व) येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्रॉमा केअर रुग्णालयात कंत्राटी कामगार हे त्यांचे कर्तव्य योग्यपणे पार पाडत असून देखील त्यांना नियमितपणे पगार दिला जात नाही.तसेच त्यांच्या पगारामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.नियूक्त कंत्राटदार हा या कंत्राटी कामगारांचे भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विमा योजनेचे पैसे भरत नसल्याने कामगार या सुविधांपासून वंचित राहिले आहेत.हे कामगार ज्या भारतीय कामगार संघटनेचे सदस्य आहेत त्या संघटनेने याबाबत कंत्राटदाराला जाब विचारला असता कंत्राटदार हा उडवाउडवीची उत्तरे देऊन स्वतःची जबाबदारी झटकू पाहत आहे.
या रुग्णालयातील प्रशासकीय कार्यालयाद्वारे खरेदीची ऑर्डर (P.O) मिळत नसल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे.रुग्णालयातील प्रशासन फंड नसल्याचे सांगत स्वतःची जबाबदारी झटकत आहे.परंतु त्यामुळे हे कंत्राटी कामगार मात्र नाहक भरडले जात आहेत.त्यांना रुग्णालय प्रशासन व महापालिका वाऱ्यावर सोडणार आहे का ? मागील नऊ वर्षांपासून हे कंत्राटी कामगार इमानईतबारे रुग्णांची सेवा करत आहेत.कोरोनासारख्या महामारीच्या काळात सुद्धा त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली.परंतु त्यांना अद्याप कोविड काळातील भत्ते मिळाले नाहीत.सिग्मा नामक कंपनीने अद्याप या कामगारांचा भविष्यनिधी भरलेला नाही.तसेच सध्या केरवान कंपनीचे कंत्राट या रुग्णालयात सुरू असून ही कंपनी वेळेवर पगार देत नाही.
त्यामुळे या अशा प्रकारच्या अनेक समस्यांना कामगारांना तोंड द्यावे लागत आहे.महापालिका व रुग्णालय प्रशासन मात्र कामगारांचा अंत पाहत आहे.कामगारांच्या या समस्यांवर तातडीने तोडगा न काढल्यास भारतीय कामगार सेनेतर्फे कठोर पावले उचलावी लागतील, अशी भुमिका भारतीय कामगार सेनेने घेतली आहे.