नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्य़ात या ना त्या आजाराने अंथरुणावर महिनोंमहिने खिळून असलेल्या पोलीस अंमलदारांच्या घरी दरमहा न चुकता किराणा व जीवनोपयोगी वस्तू पाठविल्या जातात. आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेण्याची नंदुरबार पोलीसांची दिलदार वृत्ती सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.
कधीकाळी खात्यासाठी जीवाची बाजी लावणारे पोलीस अंमलदार जेव्हा ताणतणावाची नोकरी, अनियमित जेवण व अतिरिक्त काम यामुळे गंभीर आजारी पडतात व अंथरुणावर खिळून रहातात अशा वेळेस त्यांना व कुटुंबियाना एकटे पडू दिले जात नाही.नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी उदयास आलेली ही योजना नंदुरबारच्या सर्वच पोलीसांचे मनोबल वाढविणारी ठरली आहे.मात्र या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे सहकारी पोलीस अधिकारी यांचे यात खरे योगदान असल्याने त्यांना याचे श्रेय ते देतात.
"तुम्ही कामात कमी पडू नका, तुमच्या वेलफेअरमध्ये मी कमी पडणार नाही" असा संदेश देणा-या आपल्या कॅप्टन बद्दल म्हणजेच एस.पीं.बद्दल नंदुरबार पोलीसांत यामुळेच प्रचंड आदर पहायला मिळतो.