शरयू नदीच्या तिरी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाआरती
नवी दिल्ली प्रतिनिधी
महाराष्ट्राचे देशातील अन्य राज्यांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहे, त्यातही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते अतुट असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत शरयु नदीच्या तिरी केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत शरयु नदीवरील विशेष महाआरती सायंकाळी करण्यात आली.
मुख्यमंत्री श्री शिंदे हे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून आज अयोध्या येथे शरयू नदीच्या किनारी झालेल्या महाआरतीत ते सहभागी झालेत. यावेळी श्री शिंदे बोलत होते.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्याचे नाते खूप जुने आणि अतुट असे आहे. उत्तर प्रदेशकडे संपूर्ण देश हा आस्थेने आणि श्रध्देने पाहत असल्याचे ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांचे खुल्या मनाने उत्तर प्रदेश वासीयांनी उत्साहात स्वागत केल्याच्या भावना त्यांनी यावेळी बोलुन दाखविल्या. मुख्यमंत्री होण्यापूर्वी अनेक वेळा या परीसरात नियोजना निमित्ताने आल्याच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच अयोध्या नगरीत आल्यावर इथल्या जनतेने आपलेसे केले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी शासन व प्रशासनातील सर्व वरिष्ठांचे आभार मानले.
मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी शरयू नदीची पूजा केली. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या साक्षीने विशेष महाआरती झाली. शरयु नदीचा संपूर्ण परिसरात रोषणाई करण्यात आली . संपूर्ण वातावरण भक्तीमय होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतच्यावेळी आतषबाजी करण्यात आली. राज्यातून खास गोंधळी लोककलेचे पथक शरयू नदीवर उपस्थित होते. महाआरतीच्या वेळी या पथकानेही आपल्या कलेचे प्रदर्शन केले .
याप्रसंगी लक्ष्मण किल्लाचे मैथलीशरण महाराज, शशीकांत महाराज, उत्तप्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह, राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे , अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कामगार मंत्री सुरेश खाडे, राज्यातील आमदार यासोबत खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, संत, महंत आदी मोठया संख्येने उपस्थित होते.