पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या वतीने नुकताच पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सोलापूर व आसपासच्या जिल्ह्यातील पालक वर्ग उपस्थित होते.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली हा पालक मेळावा घेण्यात आला. पालक प्रतिनिधी म्हणून बुक्स डीलरचे एरिया व्यवस्थापक किशोर दळवी तसेच महिला पालक प्रतिनिधी सौ.वर्षा दळवी हया उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील हे देखील उपस्थित होते. प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ.मीनाक्षी पवार यांनी महाविद्यालयाच्या २५ वर्षांच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे, संशोधनासाठी मिळालेला निधी, उच्च शिक्षित प्राध्यापक, उपलब्ध साहित्य सामग्री, सोयी, सुविधा, कमवा आणि शिका योजना, रात्र अभ्यासिका, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सोलार रुफ टॉप पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, जिमखाना, लायब्ररीमध्ये उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी संदर्भ पुस्तके, वसतिगृहातील सुविधा, बस सुविधा, १०२४ एम.बी.पी.एस. क्षमतेच्या लिज लाईनसह वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम आदी सुविधांची माहिती दिली.
ट्रेनिंगचे व प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे यांनी पदवी अभियांत्रिकीच्या जवळपास तिसऱ्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी कोणती तयारी करून घेतली जाते व विद्यार्थ्यांना मोठमोठ्या पॅकेजच्या कंपन्या कशा मिळतात, यासाठी कोणती तयारी करावी लागते, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे मार्केटमधील महत्व, विविध कंपन्या, कोअर कंपन्या, गेट परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टींना कसे प्राधान्य द्यायचे? या महत्वाच्या विषयांची माहिती सांगितली. विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती म्हणाले की, ‘पालकांनी वेळोवेळी आमच्या विभागाच्या वर्ग शिक्षकांशी, प्रॉक्टर टीचर व संबंधित प्राध्यापकांशी संवाद साधून पाल्याची प्रगती जाणून घ्यावी. यामुळे आपला पाल्य अधिक जागरूक राहून गंभीरपणे अभ्यास करू शकतो.’ असे आश्वासन त्यांनी दिले. महिला पालक प्रतिनिधी सौ.वर्षा दळवी व इतर पालकांनी महाविद्यालय आणि संस्थेच्या नियमांमुळे पालकवर्ग समाधानी असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. ‘कोड माइंड’ या कंपनीमध्ये प्लेसमेंटच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या भाग्यश्री पाटील, अश्विनी चव्हाण, साक्षी शिरकांडे, रितेश चव्हाण, आशुतोष मोरे, आयेशा सय्यद, निकिता लोहार, स्नेहल लिंगारे, शौर्य गरड व अविष्कार उबाळे या दहा विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमानंतर पालकांनी आपल्या पाल्यांच्या वर्ग शिक्षक व इतर प्राध्यापकांच्या भेटी घेवून पाल्याच्या प्रगतीबाबत विचारणा करून अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील असे मिळून जवळपास २०० च्या आसपास पालक, विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा मिटकरी, धनराज इंगळे व प्रा.नीता कुलकर्णी यांनी केले तर प्रा. शिवभक्ती देशमुख यांनी आभार मानले.