पशुवैद्यकांनी अद्यावत तंत्रज्ञान अंगीकृत केले पाहिजे -अतिरिक्त आयुक्त डॉ.शीतल मुकणे
पंढरपूर प्रतिनिधी
‘पशूंची सेवा - शुशुश्रा करत असताना आपण पशु हा आपल्या घरातील एक सदस्य आहे. या भावनेने उपचार करतो. यात एकाग्र होवून कार्य करतो. पशुवैद्यकांच्या या प्रामाणिक कार्यामुळेच पशु हे आजारातून, रोगातून बरे आणि ठणठ्णीत होतात. पशु बरे झाल्यावर मात्र आपल्याला मिळणाऱ्या वेतनापेक्षाही अधिक आनंद झाल्याचे पशुवैद्यकांच्या चेहऱ्यावरून दिसून येते. याचे कारण म्हणजे आपण आपल्या सेवाभावी कार्य अत्यंत आत्मीयतेने करत असतो. आता विज्ञानातील वाढत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी पशुवैद्यकांनी पशु वर उपचाराचे कार्य करताना अद्यावत तंत्रज्ञान अंगीकृत केले पाहिजे.’ असे प्रतिपादन पुण्यातील पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.शीतल मुकणे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ निमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात पुण्यातील पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.शीतल मुकणे हे प्रमुख पाहणे म्हणून मार्गदर्शन करत होते. पुणे विभागाच्या पशुसंवर्धन विभागातील सहआयुक्त डॉ.संतोष पंचपोर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रारंभी पशुवैद्यकाचे प्रतिक असलेले भगवान श्रीकृष्ण व स्व.डॉ.सुहास देशपांडे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. सहआयुक्त डॉ.सत्यवान भिंगारे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून पाहुण्यांचे स्वागत केले. पंढरपूर मधील ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विश्वासराव मोरे यांनी प्रस्तावनेत ‘जागतिक पशुवैद्यक दिना’चे महत्व, लम्पी कालावधीत पशुवैद्यकांचे अनमोल कार्य, त्यांचे स्थान, पशुंचे आजार व त्यावर उपचार करताना येणाऱ्या अडचणी, व पशुवैद्यकांचे योगदान याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे उदघाटन व स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘आजचा दिवस हा सर्व दिवसांपेक्षा वेगळा आहे. त्याचे कारण म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवा करताना पशुवैद्यक हे आपले आयुष्य वेचतात. समोरचा रुग्ण बोलू शकत नसताना देखील त्याला कोणता आजार झाला आहे हे ओळखून त्यावर ते यशस्वी निदान करतात. हे कार्य कौशल्यास्पद आहे. पहिल्या सत्रात पशुंमधील रक्त तपासणी निष्कर्ष व अनुमान याबाबत शंका-समाधानपर व्याख्यान झाले. यामध्ये सांगलीचे विषयतज्ञ डॉ.विजय ढोके व माजी सह आयुक्त डॉ.महेश बनसोडे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सहआयुक्त डॉ. पंचपोर म्हणाले की, ‘पंढरपूरच्या जेष्ठपशुवैद्यक प्रतिष्ठानचे कार्य दिवसेंदिवस बहरत चालले असून प्रतिष्ठानच्या अनेक क्रियाशील उपक्रमामुळे कार्य करत असणाऱ्या पशुवैद्यकांना प्रेरणा मिळत असते. परंतु या प्रतिष्ठानचे कार्य मात्र सोलापूर जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहे. त्यांचे उत्कृष्ठ कार्य पाहता याची व्याप्ती राज्यभर वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.’ लम्पीच्या कालावधीत राज्यातील पशुवैद्यकीय मंडळींनी अहोरात्र कष्ट घेऊन पशूंना लम्पी आजारापासून दूर ठेवले. राष्ट्रीय कर्तव्यपूर्ती केलेल्या सर्व पशुवैद्यकांचा पाहुण्यांच्या हस्ते ‘लम्पी योद्धा सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आले.माजी सहायक आयुक्त डॉ.अरविंद देशपांडे यांना स्व.डॉ.सुहास देशपांडे जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार म्हणून कासेगावचे डॉ. प्रवीण जाधव, आंधळगावचे डॉ.तानाजी भोसले, भोसे येथील पशुधन पर्यवेक्षक अर्जुन बाड, मंगळवेढा येथील डॉ.समाधान माळी या चौघांना देण्यात आला.
यावेळी साताऱ्यामधील पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.अंकुश परिहार, सोलापूरमधील पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.भास्कर पराडे, कराड मधील तालुका पशु चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.दिनकर बोर्डे, डॉ.प्रियांका जाधव-कोळेकर, मंगळवेढ्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.ब्रम्हदेव कदम, डॉ.तानाजी भोसले, पशुधन पर्यवेक्षक देशपांडे व मोहोळे पंढरपूरमधील पशुवैद्यक प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सचिव डॉ.अनिल सरदेशमुख, सहआयुक्त डॉ.प्रमोद बाबर, डॉ. रावसाहेब पताळे, डॉ.उद्धव रसाळे, डॉ. मदने, डॉ.गायकवाड, डॉ.पवार, डॉ.आय.डी.शेख, डॉ.वायबसे यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच परिसरातील पशुवैद्यक व पशु पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सविता दुधभाते यांनी केले तर डॉ. सदानंद टाकणे यांनी आभार मानले.