क्रांतीसुर्य महात्मा फुलेंचा आदर्श कोण घेतय? समाजसेवक गणेश अंकुशराव यांचा खडा सवाल!
दिवसेंदिवस महाग होत चालेल्या शिक्षणाचा प्रश्न आणला ऐरणीवर
पंढरपूर प्रतिनिधी
आजची शिक्षण पध्दती आणि एकुणच शैक्षणिक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलाय, खासगी कोचिंग क्लासेस आणि खासगी शैक्षणिक संस्थांनी उच्छाद मांडलाय, शिक्षण प्रचंड महागडं बनलंय, पंढरपूर नगरपरिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांविना ओसाड पडल्यात. याकडे कोण पुढारी, कोण नेता, कोण समाजसुधारक लक्ष देतोय का? सर्वसामान्यांना शिक्षणाची कवाडं खुली करण्यासाठी आपलं सबंध आयुष्य वाहिलेल्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुलेंचा आदर्श खरंच कोण घेतंय का? असा खडा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी महाराष्ट्रातील जबाबदार नेते मंडळींसह पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाला केलाय. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीच्या औचित्याने त्यांनी दुर्लक्षित होत चाललेला परंतु अतिशय महत्वाचा असा दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असलेला महागड्या शिक्षणाचा हा प्रश्न ऐरणीवर आणलाय.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले, एवढेच नव्हे तर तळागाळातील विद्यार्थ्यांना, महिला भगिणींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी आपलं सबंध आयुष्य वेचलं. त्यांच्या जयंतीदिनी फक्त हार घालुन या महामानवांना अभिवादन करणारे या महाराष्ट्रातील नेते मंडळींनी महाग होत चाललेल्या शिक्षणासाठी काय केलं? हल्ली अगदी बालवाडीपासुन ते उच्च शिक्षणापर्यंत आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागतेय. पंढरपूर शहराचंच बघायचं झालं तर पंढरपूर नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या नाममात्र राहिलीय. एकीकडे हे चित्र असून दुसरीकडे मात्र खासगी शैक्षणीक संस्था आणि कोचिंग क्लासेस ची गर्दी शहरातील विविध भागात व उपनगरातुन तसेच ग्रामीण भागातही बोकाळलीय. भरमसाठ फी घेणार्या यांच्यावर कोणत्याही प्रकारचे शासकीय निर्बंध नसल्याचे चित्र आहे.
किमान शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या औचित्याने तरी याबाबत गंभीरपणे विचार करुन शासन, नेते, आमदार, खासदार यांचेसह पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाने योग्य ती ठोस पावले उचलावीत अन्यथा यापुढे याविरुध्द लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारु. असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिलाय. यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.