मायणी प्रतिनिधी
मायणी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने शहीद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन म्हणून 'क्रांतिदौड' आयोजित करण्यात आली.
शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना अभिवादन म्हणून या क्रांतिदौडचे आयोजन क्रीडा संचालक डॉ. अक्रम मुजावर व प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्रांगणात मायणीचे उपसरपंच दादासाहेब कचरे, मुख्याध्यापिका वर्षा येवले, प्राचार्य विजयकुमार पिसाळ यांच्या उपस्थितीत 'क्रांतिदौड' सुरू झाली. गावातील मुख्य रस्त्याने पक्षी अभयारण्य ते परत महाविद्यालय या मार्गावरून ९६ विद्यार्थी व इतर तरुण दौडमध्ये सहभागी झाले. सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.