सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन बी नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग कॉलेजचे सिव्हिल इंजीनिअरिंग विभागातील प्राध्यापक सतीश भारत आवारे यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गेट परीक्षेत 2016 पासून सलग झालेल्या गेट परीक्षेत सतत ' आठ ' वेळा उत्तीर्ण होण्याचा विक्रम केला आहे हे अभिमानास्पद व कौतुकास्पद यश असल्याची माहिती सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी दिली.
मलिकपेठ (तालुका मोहोळ) येथील प्राध्यापक सतीश आवारे यांनी अभियांत्रिकीच्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या परीक्षेत 427 गुण मिळवून सतत आठ वेळा उत्तीर्ण होण्याचा विक्रम केला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मलिकपेठ विद्यालय, मलिकपेठ तर माध्यमिक शिक्षण नेताजी कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ येथे झाले असून स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण यांनी एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर तर पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथून स्थापत्य अभियांत्रिकीच्या 'बांधकाम आणि व्यवस्थापन' या विषयातून पूर्ण केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये दहा तर राष्ट्रीय परिषदेमध्ये दोन प्रकल्प पत्रे प्रकाशित केले आहेत .
यावेळी अभिनंदन पर स्वागत करताना स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक प्रदीप तपकिरे म्हणाले अभियांत्रिकीच्या गेट परीक्षेत मिळालेले प्राविण्य हे सिव्हिल अभियांत्रिकीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सतत प्रेरणा देणारे व जिद्द , चिकाटी, सातत्य, प्रयत्न या जोरावर मिळालेले यश अवर्णनिय आहे. विविध राज्यस्तरीय व विद्यापीठ स्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा प्रथम श्रेणी प्राविण्य मिळवले आहे व ते उत्कृष्ट प्राध्यापक समन्वयक मार्गदर्शन व अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते अभियांत्रिकी व्यवस्थापन, अभियांत्रिकी अर्थशास्त्र, रस्ते व वाहतूक अभियांत्रिकी, बांधकाम अभियांत्रिकी पद्धती आणि व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचा महत्त्वपूर्ण असलेला गेट परीक्षेचा अभ्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली करावयास मिळत आहे व पुढील होणाऱ्या अभियांत्रिकीच्या गेट परीक्षेत संपादन करण्यासाठी विद्यमान विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले.
प्राध्यापक सतीश आवारे यांचे यश म्हणजे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे गौरवउद्गार त्यांनी काढले. या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रविंद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांनी अभिनंदन केले.