पंढरपूर प्रतिनिधी
स्वामी विवेकानंदांनी राष्ट्र प्रथम हा विचार मांडून तरुणांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण केली.भारतीय संस्कृतीचे महत्त्व साता समुद्रापार पोहोचवण्याचे कार्य केले. अशा तरुणांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या नावाने एखादा चौक तयार होत असेल तर तो पंढरपूरकरांसाठी कायम प्रेरणादायी ठरेल. असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांतराव परिचारक यांनी केले. पंढरपूर येथील नवी पेठ परिसरात उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद चौक या नामफलकाचे नूतनीकरण प्रसंगी ते बोलत होते.
पंढरपूर येथील विवेकानंद प्रेमी शिवदास भिंगे गुरुजी व अनंतराव कर्वे यांनी १२ जानेवारी १९७३ रोजी या चौकामध्ये स्वामी विवेकानंदांचा नामफलक लावला होता. या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ तेथील नामफलकाचे नूतनीकरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना परिचारक पुढे म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी सातत्याने शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवून त्या पद्धतीने शिक्षण दिल्यास खऱ्या अर्थाने भावी पिढी समर्थपणे उभी राहू शकेल हा विचार दीडशे वर्षांपूर्वी मांडला. आजही त्यांच्या विचारांची गरज आहे. भिंगे गुरुजी व अनंतराव कर्वे यांनी विवेकानंदांच्या विचारांची एक पिढी निर्माण करण्याचे कार्य केले आहे, हे कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवदास भिंगे गुरुजी, माजी नगराध्यक्ष सतीश मुळे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक दत्तात्रय धोत्रे, विवेक परदेशी, अर्बन बँकेचे संचालक मनोज सुरवसे व्यापारी कमिटीचे चेअरमन सतीश लिगाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोमनाथ गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सचिन लादे यांनी केले. याप्रसंगी राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व नामफलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवदास भिंगे गुरुजींचा विशेष सन्मान करण्यात आला. शेवटी आभार माधव कर्वे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक इरकल यांनी केले.
याप्रसंगी डॉ.आनंद भिंगे, मंदार केसकर, प्रवीण देशपांडे, संजय कुलकर्णी, रामेश्वर कोरे, डॉ प्रशांत ठाकरे, ओंकार कापसे, आनंद नगरकर, बाळकृष्ण डिंगरे, विनोद भरते, प्रताप चव्हाण, रविराज सोनार,तुकाराम खंदाडे, गजानन काकरंबे, सौरभ थिटे, राजेंद्र कोरके, दत्ता दहिवडकर, तुकाराम कवठेकर व परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.