मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थेचा ३१ वा वर्धापन दिन सोहळा नेरुळ येथील संस्थेच्या ज्येष्ठ नागरिक भवन मधील गणेश सभागृहात उत्साही वातावरणात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर मराठी विज्ञान परिषद चे कार्यवाह अ. पां. देशपांडे, आईस्कॉन - फेस्कॉन चे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, जेष्ठ नागरिक संघ चे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, सचिव दीपक दिघे, खजिनदार विकास साठे आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. नार्वेकर म्हणाले की, नवी मुंबई महापालिका राबवीत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांत ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुळ या संस्थेमधील ज्येष्ठांचा सक्रिय सहभाग असल्याचा आपल्याला आदर वाटत असून या ज्येष्ठांच्या विविधांगी अनुभवाचा महापालिकेसाठी कसा यथायोग्य उपयोग करुन घेता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. असं सांगून ते पुढे म्हणाले की, संघाने उभारलेली ही सुंदर इमारतीची वास्तू व येथे नियमितपणे चालवलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक करून, नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिकाधिक विरंगुळा केंद्र उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न राहिल. असे त्यांनी सुचित केले.
आपण आयुष्यभर करत असलेले, आवडीचे काम निवृत्तीनंतर थांबवू नका. तरुणांना प्रोत्साहन द्या. आपले अनुभव शब्दबध्द करा. कारण अलिकडे आत्मचरित्रे वाचणाऱ्यांची संख्या वाढत असून आपले रुट्स शोधत परदेशस्थ भारतीयांची तरुण मुले भारतात येत असतात, त्यांना अनेकदा योग्य ती माहिती मिळत नाही, त्यांना हे लिखाण उपयोगी पडेल असा सल्ला अ. पां. देशपांडे यांनी आपल्या भाषणातून यावेळी दिला. आप्पासाहेब टेकाळे यांनीही ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या भरीव कार्याचा गौरव केला.
संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी प्रास्ताविकातून ज्येष्ठ नागरिक संघ राबवीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक तसेच वैवाहिक जीवनाची पन्नाशी गाठलेल्या जोडप्यांचा तसेच कार्यक्रमास उपस्थित विशेष निमंत्रितांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित्रा कुंचमवार आणि विकास साठे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री. प्रभाकरराव गुमास्ते, नंदलाल बॅनर्जी, रणजीत दीक्षित, दत्ताराम आंब्रे, अजय माढेकर, विजय सावंत, श्रीमती निर्मला शिंदे, श्रीमती कल्पना मोहिते, श्रीमती कमल आंगणे यांनी खूप मेहनत घेतली.