चिंचणी प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील चिंचणी या गावाला जिल्ह्यातील पहिले 'क' वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आलेला आहे.लोकप्रतिनिधी म्हणून शासनाच्या माध्यमातून चिंचणी गावांमध्ये अनेक योजना राबवून चिंचणी ला ग्रामीण कृषी पर्यटनातून चिंचणी गावातील सर्वांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार बबन दादा शिंदे यांनी सांगितले. यासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामीण वस्तुसंग्रहालय ,महिला बचत गट भवन, नाना नानी पार्क ,स्विमिंग पूल,बोटींगसाठी बंधारा, यासारख्या योजनांना मंजुरी मिळाली असून यातील बहुतांश कामे अंतिम टप्प्यात आहेत.
चिंचणी गावची एकजूट लोकसहभाग या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून हजारो झाडे लावून जगवली यामुळे हे गाव मिनी महाबळेश्वर म्हणून जिल्ह्यामध्ये नावारूपाला येत आहे. आणि याच नैसर्गिक व पर्यावरण पूरक वातावरणाची मदत घेत या ठिकाणी पर्यटन संचालनाचे नोंदणीकृत ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र उभे राहीले आहे. याचाच भाग म्हणून या गावांमध्ये काल हुरडा पार्टीची आखटी पेटवून या विभागाचे आमदार बबन दादा शिंदे व त्यांच्या पत्नी सुनंदाताई शिंदे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. चिंचणी हे विस्थापित गाव परंतु या गावातील तरुणांनी जिद्दीच्या जोरावर एक आदर्श गाव निर्माण केले आहे. यासाठी गावकऱ्यांना प्रिसिजन ग्रुप ,सोलापूर सोशल फाउंडेशन, रोटरी क्लब, फेसबुक फ्रेंड फाउंडेशन, ग्रामपंचायत पिराची कुरोली यांचे सुद्धा मोठे सहकार्य मिळत आहे.
गावातील योजना अत्यंत पारदर्शकपणे राबवून एक निसर्गरम्य वातावरण निर्माण केलेले आहे. ग्रामीण पर्यटनाला गेल्या चार महिन्यांमध्ये भरभरून प्रतिसाद मिळालेला असून आता हुरडा पार्टीला सुरुवात झालेली आहे.