रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 च्या भल्या पहाटेच सांगोला पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुलकर्णी साहेब व त्यांच्या टिमने कोळा नगरीत प्रवेश केला.पहाटेची अंगाला गार झोंबणारी हवा.अशा हर्षोल्लासात सांगोला पोलीस टीमचे कोळ्यात आगमन झाले.वय वर्षं ५२ असलेले सांगोल्याचे पोलीस निरीक्षक कुलकर्णी साहेब यांचा उत्साह एखाद्या १७ - १८ वर्षीच्या पोरांना पण लाजवेल अशा उत्साहाने ट्रेकिंगला सुरुवात झाली.
ट्रेकिंगची सुरुवात सकाळी 6.16 मिनिटांनी म्हसोबा डोंगर पायथ्याने केली.सकाळचा थंडावा मन मोहीत करणारा होता.विविध पक्षांची किलबिल व त्यांचे मंजुळ आवाज मनाला ताजे तवाने करत होते.शुध्द आणि जिवंत पाण्याचा झरा खळखळून वाहत होता.गवताची पाती डोलत होती.सर्वानाच म्हसोबाच्या डोंगराने मोहून टाकले.कोणी डोंगरावर सेल्फी घेत होते.तर काही कोळ्याचा सुंदर, स्वच्छ आणि देखणा परिसर आपल्या मोबाईल मध्ये टिपत होते.
म्हसोबा ट्रेकिंग अति उत्साहात पार केले.सर्व टीमने पहिला टप्पा अतिशय ताकदीने पूर्ण केला.म्हसोबा मंदिरा जवळ थोडी विश्रांती घेऊन टीमचा पुढचा टप्पा सुरू झाला.म्हसोबाच्या डोंगर सपाटीवरून जाताना अनेक रंग बिरंगी फुले,डोलणारे गवत, विविध वनस्पती, फुलपाखरे आणि छोटे मोठे प्राणी यांची लगबग पहायला मिळत होती.सकाळचे कोवळे ऊन मनाला ऊर्जा देत होते.रानातील रानमेवा खात खात संपूर्ण टीमने आपल्या शरीराचा आणि मनाचा थकवा दूर करत गाणी गात, विनोद करत म्हसोबा ट्रेकिंगचा लांबचा पल्ला पूर्ण केला.
म्हसोबा डोंगर ट्रेकिंग संपते न संपतेच सर्वांच्या नजरा वळल्या त्या भूपाल गडाकडे.भूपाल गडाकडे जाण्याचा सर्वांनी चंगच बांधला होता.काही पोलीस बांधवांच्या मनात शंकेची पाल कुचकुचू लागली आता अजून किती दूर जायचे आहे.? पण कुलकर्णी साहेब वय ५२ आणि ट्रेकिंग ला सर्वात पुढे असल्याने कोणीच ना चा पाढा वाचला नाही.
सुरवात झाली भूपाल गडाकडे.. सर्वप्रथम मोहित्याच्या वस्त्या पार करून गेलो.छोटे छोटे ओहोळ शांत वाहत होते.सर्वानी अतिशय थंड पाणी आपल्या चेहऱ्यावर शिंपडून फ्रेश होवून टीम ने पुन्हा जोराने ट्रेकिंग ला सुरुवात केली.खरी ट्रेकिंगची कस काय असते ते उभा डोंगर पादाक्रांत करताना सर्वांना समजले.परंतू जय..जय.. जय... शिवाजी...,हर... हर.. महादेवच्या.. घोषणा देतच आम्ही भूपाल गडाकडे कूच केली.
भूपाल गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर संघटनेने प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या समाधीचे दर्शन घेतले.तसेच शंभू महादेवाचे दर्शन घेऊन आमचा पायी प्रवास पुन्हा सुरू झाला.अतिशय उत्साहात हसत ,खेळत,बागडत भूपाल गड - टेंभू कालवा ते पुन्हा म्हसोबा पायथा असा तब्बल 13 कि.मी.प्रवास 3 ते 3.30 तासात अतिशय उत्साहाने पूर्ण केला.
कोळा परिसर अनेक ट्रेकर्सना आकर्षित करत आहेत.प्रामुख्याने महादेव डोंगर,येसनखडी,सटवाई डोंगर,सातपट्टा डोंगर, म्हसोबा डोंगर,भुपालगड, शुक्राचार्य डोंगर,जकाई खोरे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
जाता जाता कोळ्याच्या लोकांची पाहुणचार करण्याची दिलदार वृत्ती ही या पोलिस सेवेतील लोकांना पाहायला मिळाली.युवा नेते धनाजी सरगर ,माजी सरपंच शहाजी हातेकर व पैलवान ज्ञानेश्वर करांडे व पोलीस पाटील प्रवीण हातेकर यांनी आपल्या पाहुण्यांचा पाहुणचार केला.
ट्रेकिंग हे आता कोळ्याच्या वैभवात नक्कीच भर घालेल यात दुमत नाही.. परंतु काय झाडी, काय डोंगर दुसऱ्या राज्यातील पाहण्यापेक्षा आपल्या भागात काय झाडी, काय डोंगर आणि काय ट्रेकिंग.. याकडे पाहून इथला पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी काही तरी आता महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून विकास करावा हीच अपेक्षा.
प्रा.आनंदा आलदर