मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत विहंग प्रतिष्ठान आणि शां. कृ. पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या विज्ञान कार्यशाळे ला चांगला प्रतिसाद मिळाला. अणु ऊर्जा नियामक मंडळाचे सदस्य व्ही. आर. धोत्रे आणि डी. एम. राणे यांनी किरणोत्सार, अणु ऊर्जा, त्याचे फायदे-तोटे यासंबंधी विस्तृत माहीती आणि मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थी, शिक्षकांना केले.
पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य महादेव यादव यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना शिकवतानाच शिक्षकांनाही ज्ञानार्जनाची आवश्यकता असते. विशेष करून विज्ञान क्षेत्रातील बदल, प्रयोग यांची माहिती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अणुचा शोध हा आपल्या प्राचीन युगामध्ये लागला. अणु ऊर्जेबाबतचे गैरसमज दूर होणे आवश्यक असल्याचे आणि त्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे अणु ऊर्जा मंडळाचे आनंद पिंजरकर यांनी सांगितले.
विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून होणारा किरणोत्सार याचा फायदा आणि तोटा तसेच अणु भट्टी उभारताना घेतली गेलेली काळजी, विविध ठिकाणी वापरात असलेल्या किरणोत्सारी उपकरणांच्या संपर्कात येणारे सर्वसामान्य नागरिक तसेच कर्मचारी यांची सुरक्षितता याबाबत वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
खानोलकर हायस्कूल (चुनाभट्टी), सोशल सर्व्हिस लीग (परळ), समता विद्यालय (साकीनाका), प्रबोधन हायस्कूल (कुर्ला पश्चिम) या शाळांमधील शिक्षक त्याचप्रमाणे पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान मंडळाचे विद्यार्थी यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
विहंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी आभार मानले. प्रतिष्ठानचे विश्वस्त राजीव भांडारे, सदस्य संजय सावंत, कासम तांबोळी, अॅड. गुणवंत पाटील यावेळी उपस्थित होते. पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका मनीषा बोबडे यांनी सूत्रसंचालन केले.