'पंढरपूर येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा'
पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक मानसिक आरोग्य दिन नुकताच संपन्न झाला. या औचित्याने 'सर्वांच्या मानसिक आरोग्यासाठी प्राधान्य' या घोषवाक्याअंतर्गत उप - जिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे तपासणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ. विनायक राऊत यांनी मानसिक ताण-तणाव आणि नियमन या विषयावर व्याख्यान दिले. आहे. “सध्याचे युग हे धावपळीचे युग असून या धावपळीच्या युगामध्ये स्पर्धेमुळे प्रत्येकाच्या मनावर ताणतणाव आहेत. त्यासाठी प्रत्येकानेच आपापल्या ताण- तणावाचे नियमन करणे गरजेचे आहे.” असे मत मानसोपचार तज्ञ डॉ. विनायक राऊत यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना डॉ. राऊत म्हणाले की - “स्पर्धा, निष्क्रियता, व्यसनाधीनता, अति राग, भविष्याची काळजी, कामाची घाई, द्विधा मनस्थिती, वादविवाद या गोष्टींमुळे ताण तणाव वाढत आहेत. या ताण तणावांवर उपचार म्हणून किंवा ताण-तणावांचे नियमन करण्यासाठी नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोन, प्राणायाम, कार्यमग्न राहणे छंद जोपासणे, मनोरंजन याचा वापर करावा यामुळे प्रत्येकाच्या मनावरील ताण-तणावाचे नियमन होऊ शकेल.” याप्रसंगी डॉ. सुरज तंटक यांचेही मार्गदर्शन झाले.
यावेळी बोलताना डॉ. तंटक म्हणाले की - “ज्याप्रमाणे माणसाच्या शरीराला विकार होतात, त्याचप्रमाणे माणसाच्या मनाला सुद्धा विकार होत असतात. त्यामुळे मानवी मनाच्या विकारावर उपचार करणे गरजेचे आहे, मनोशरीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करू नये.”
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश माने, डॉ. बोधले मॅडम उपस्थित होते. या शिबिराचा लाभ पंढरपूर आणि परिसरातील अबालवृद्ध स्त्री-पुरुष यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भातलवंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप - जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.