उल्हासनगर प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर
वर्षाचा सण, दिव्यांचा उत्सव सुरू झाला आहे आणि हाच शुभमुहूर्त गाठत दिनांक २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वाजता गुगलमीटवर अखिल महाराष्ट्र साहित्य मंच, गझल समूह, सौजन्याने "गझलनगरी--ग्रंथ गझलेचा" हा गझल विशेषांक (ई बुक) गझलसमूहाचे संस्थापक मा. योगेश जी चाळके, प्रशासन मंडळ आणि अनेक गझलकरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अ.म.सा.मं., गझल समूहाच्या अध्यक्ष सौ आरती ताई लाटणे यांनी अतिशय सुंदर रीतीने केले. आरती ताईंनी गझल समूह, समूहाचे उद्दिष्ट आणि समूहाने आजवर राबवलेले उपक्रम आणि कामगिरी ह्या सगळ्याची माहीत देत समूहाची सुंदर प्रतिमा लोकांसमोर ठेवली. त्यानंतर समूहाच्या प्रशासन मंडळातील सौ. प्रियाताई मयेकर, सौ. मेघनाताई पाटील, श्री. अतुलजी दिवाकर आणि श्री. अरूणजी सावंत यांनी गझलनगरी--ग्रंथ गझलेचा या दिवाळी गझल विशेषांकाबद्दलचे आपापले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.योगेशजी चाळके यांचे अध्यक्षीय भाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी गझलग्रंथासाठी समूह प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यानंतर आपली स्क्रीन शेअर करीत त्यांनी "गझलनगरी-- ग्रंथ गझलेचा" गझल विशेषांक (ई बुक) चे प्रकाशन केले.
"गझलनगरी--ग्रंथ गझलेचा" गझल विशेषांकासाठी अखिल महाराष्ट्र साहित्य मंच, गझल समूहाच्या प्रशासन मंडळाने अथक प्रयत्न तसेच सन्मा. सल्लागार प्रिया मयेकर उल्हासनगर-ठाणे व सन्मा.संस्थापक योगेश चाळके सर यांची अधिक मेहनत म्हणून अतिशय देखणा असा अंक तयार झाला.
या गझल ग्रंथामध्ये अनेक मान्यवरांच्या गझलांसोबत काही नवोदितांच्याही गझलांना स्थान देण्यात आले आहे. इतकेच नाही तर गझलकारा सुनंदा पाटील--गझलनंदा आणि मा.योगेशजी चाळके यांच्या गझलेसंदर्भातील दिशादर्शक ठरणाऱ्या लेखांनी ग्रंथाला उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे.
गझलग्रंथाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ डोळ्यांचे पारणे फिटावे असेच आहे. अत्यंत सुंदर अशा महिरपीने गझलग्रंथाचे प्रत्येक पान सजवले आहे. सुंदर सुंदर गझलांनी नटलेला हा गझलग्रंथ म्हणजे अखिल महाराष्ट्र साहित्य मंच, गझल समूहासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.
कार्यक्रमा अखेर अध्यक्षांनी सगळ्या उपस्थितांचे आभार मानले आणि प्रकाशन सोहळ्याचा समारोप झाल्याचे जाहीर केले.