महूद प्रतिनिधी
महूद ते सांगोला या महामार्गावर मोठ-मोठाले खड्डे पडले असून या मार्गाची अक्षरशः चाळण झाली.अहो साहेब या रस्त्याने जायचं कसं ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अनास्थेमुळे गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.
इंदापूर-अकलूज-जत हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी आहे.या महामार्गा अंतर्गत महूद ते सांगोला हा सुमारे 25 किलोमीटर लांबीचा रस्ता येतो.या मार्गावरील महूद,साखर कारखाना परिसर,वाकी,शिवणे,एखतपूर पाटी, चिंचोली तलाव,गणपती मंदिर, सांगोला येथील महावितरण कार्यालय या सर्वच भागात अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत.तर या मार्गावरील महूद,वाकी,शिवणे,चिंचोली या गावातील ओढ्यांवर असलेल्या पुलांना कोठेही कठडे नाहीत.अत्यंत दुरावस्था झालेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेक वेळा अपघात होऊन निष्पापांचा जीव गेला आहे.या मार्गाच्या दुरुस्तीसाठी येथील नागरिकांनी रस्ता रोको,रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण यासारखी आंदोलने अनेक वेळा केली आहेत.मात्र निर्ढावलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याची कधीच दखल घेतली नाही.
महूद ते सांगोला या मार्गाने विद्यार्थी, नोकरदार,व्यावसायिक व तालुक्याच्या ठिकाणी विविध कामासाठी जाणारे हजारो नागरिक दररोज प्रवास करत आहेत.शिवाय जत परिसरातील नागरिक याच मार्गाने पुणे व मुंबईकडे जातात.या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक ही होत आहे.मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेल्या या रस्त्याची दुरावस्था दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने आतापर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाहीत.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने या रस्त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. नागरिकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या या विभागाचा नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे.
1) प्रस्तावावर प्रस्ताव...
मात्र एकही मंजुर नाही...
महूद-सांगोला या 25 कि.मी. मार्गा पैकी सुमारे 13 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण काम मंजूर होते.तसा कार्यारंभ आदेशही ठेकेदारास दिला होता.मात्र या संपूर्ण पंचवीस कि.मी. चे कॉंक्रिटीकरणाद्वारे दुपदरीकरण करण्याचे काम नव्याने प्रस्तावित करावे असा आदेश वरिष्ठ कार्यालयाने दिला.त्यामुळे मंजूर 13 किलोमीटर रस्ता मजबुतीकरणाचे काम रद्द करण्याबाबतचे पत्र कंत्राटदाराने दिले आहे.हे मंजूर मजबुतीकरणाचे काम रद्द करणे व संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण सह दुपदरीकरण करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे.मात्र सन 2021-22 मध्ये या कामाचा समावेश भूतल परिवहन व राजमार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वार्षिक आराखड्यात करण्यात आला नाही.नवीन कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणे,कंत्राटदार निश्चिती करून प्रत्यक्ष कामास सुरूवात करणे यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने पुन्हा संपूर्ण 25 कि.मी. लांबीच्या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे अंदाजपत्रक ही विभागीय कार्यालयाने भूतल परिवहन व राजमार्ग मंत्रालय यांच्याकडे सादर केले आहे.मात्र त्यास ही अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.केवळ प्रस्तावावर प्रस्ताव दाखल करण्याचे काम चालू आहे. प्रत्यक्षात रस्त्यावर कोणतेही काम केले गेले नाही.
2) कंत्राटदारा मार्फत महामार्ग दुरुस्ती...
शासकीय स्तरावर सर्वच प्रस्ताव प्रलंबित असल्याने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने नवीनच शक्कल लढवली आहे.नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून या विभागाने कंत्राटदारास विनंती करून कंत्राटदारामार्फत या महामार्गाच्या तात्पुरती दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे,असे अधिकारी सांगतात. मात्र केवळ बारीक खडी व माती टाकून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
3) मोठ्या प्रमाणावर खराब असलेल्या या रस्त्यामुळे दररोज अपघात घडत आहेत. यामुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहे. प्रशासनाच्या या अयोग्य धोरणा विरोधात आपण शिवणे ग्रामस्थासह रास्ता रोको आंदोलन करणार आहे.- दादासाहेब घाडगे,शिवणे
4) पावसाळा असल्याने डांबराने खड्डे भरणे व कामासाठी डांबर प्राप्त होणे हे शासकीय नियमानुसार अडचणीचे आहे.या मार्गाच्या दुरुस्तीचे काम मंजूर नाही. देखभाल दुरुस्तीचे काम मंजूर होताच त्वरित काम हाती घेऊन पूर्ण केले जाईल.- ए.ए.खैरदी, उपविभागीय अभियंता,राष्ट्रीय महामार्ग उपविभाग,शेटफळ