मुंबई - लक्ष्मण राजे
जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व शिक्षक गणेश हिरवे यांनी १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिनानिमित्त समाजातील जवळपास १५० लोकांना वाचनीय गोष्टींची पुस्तकं व मासिक विनामूल्य भेट दिली.
१५ ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस व २०१५ पासून तो सर्वत्र वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे महत्व जाणून ही पुस्तक भेट देण्यात आली.हल्ली सोशल मीडियाच्या जमाण्यात पुस्तक वाचण्याचे प्रमाण खूपच कमी झाले असून प्रत्यक्ष हातात पुस्तक घेऊन वाचणारे साहजिकच दिसतात, कारण आता सर्वांच्या हातात मोबाइल आलाय.वाचनामुळे ज्ञानात भर पडते, रोज नवनवीन माहिती समजते.तेव्हा दिवसातून किमान एक पान काहीतरी चांगल वाचायलाच हवं असे हिरवे सर सांगतात.पुस्तक नाही तर निदान रोजचे वर्तमानपत्र आपण सहज वाचू शकतो.
हिरवे यांनी आत्तापर्यंत विविध सण समारंभ, क्रीडा स्पर्धा, ग्रंथालये कार्यक्रम,पाहुणे, नातेवाईक यांना जवळपास साडे तेरा हजार पुस्तक स्वखर्चाने मोफत भेट दिलेली आहेत.त्यांच्या या पुस्तक भेट देण्याच्या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केलं असून आता अनेकजण त्यांच अनुकरण करीत पुस्तक भेट देताना दिसतात.