यूथकौन्सिलच्या स्वयंसेवकांचा रुग्णांच्या सेवेत दिवाळी सण साजरा
मुंबई प्रतिनिधी - गणेश हिरवे
श्री गजानन महाराज भक्त मंडळ - वाशी, यूथकौन्सिल नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ऑक्टोबर रोजी पनवेल तालुक्यातील नेरे येथील शांतिवन मधील कुष्ठरोग निवारण समिती येथे उपचार घेत असणाऱ्या रुग्णांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांकरिता दिवाळी सणानिमित्त अन्नधान्य, रुग्णांच्या जखमेवर बांधण्यासाठी बँडेजेस आणि दिवाळी फराळ संचाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी विचारमंचावर कामगार नेते प्रफुल्ल म्हात्रे, ‘कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन - पनवेल'चे प्रमुख कार्यवाह विनायक शिंदे, श्री गजानन महाराज भक्त मंडळाचे सुरेंद्र झापर्डे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी प्रभाकर गुमास्ते, दीपक दिघे, विकास साठे, ‘आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत उपस्थित होते.
गेली पस्तीस वर्षे यूथकौन्सिल नेरुळ ही समाजसेवी संस्था समाज हिताच्यादृष्टीने निष्ठेने काम करत असल्याबद्दल कौतुक करुन दिवाळीची आणि रविवारची सुट्टी असूनही या संस्थेचे सदस्य न थकता आजही येथे येऊन काम करताहेत, लोकसेवेत देव शोधत आहेत हे खूप मोलाचे आहे असे प्रफुल्ल म्हात्रे आपल्या भाषणात म्हणाले. जनसामान्यांचा कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही म्हणावा तसा सुधारला नसून इतक्या वर्षांचे लोकशिक्षण, प्रबोधन, प्रसारमाध्यमांनी जनजागृती करुनही त्यात फारसा फरक पडलेला नाही, असे नमूद करुन कुष्ठरोग अर्थात महारोग हा केवळ त्वचेचा आजार असून तो संसर्गाने पसरत नाही हे डॉक्टर, शास्त्रज्ञ, वैज्ञानिकांनी स्पष्ट केल्यावर आता या दृष्टीकोनात फरक पडायला हवा अशी अपेक्षा राजेंद्र घरत यांनी आपल्या भाषणातून यावेळी व्यक्त केली. प्रभाकर गुमास्ते यांनी ज्येष्ठ नागरिक संघ करत असलेल्या कामांची माहिती दिली. आर सी एफ कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या कबड्डी खेळात राजा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रवी करमळकर यांना यावेळी सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरवण्यात आले.
तसेच निशांत बनकर यांचाही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यथोचित सत्कार करण्यात आला. सदर समितीच्या इस्पितळात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बेडजवळ जात दिवाळी फराळ वाटून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यूथ कौन्सिल नेरुळचे मुख्य सचिव सुभाष हांडेदेशमुख यांनी कुशलतेने केले. उपाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले.या कार्यक्रमानंतर यूथकौन्सिल नेरुळ या संस्थेची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली हसत खेळत वातावरणात पार पडली. सभेत संस्थेच्या पुढील वर्षीच्या उपक्रमांच्या आयोजनाची दिशा ठरविण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री. सुभाष हांडे देशमुख, शिवाजी शिंदे, दत्ताराम आंब्रे, यशवंत गोनेवाड, निशांत बनकर, सुरजितसिंह उभी, प्रकाशराव पवार, नरेश विचारे, दिलीप चिंचोळे, भालचंद्र माने आदींनी परिश्रम घेतले.