पंढरपुरात 200 खाटांचे सामान्य रूग्णालय बांधावे
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयाचे 100 खाटांचे रूपांतर 200 खाटांचे सामान्य रूग्णालय श्रेणीमध्ये दि. 24 मे 2022 रोजीचे शासन निर्णयानुसार रूपांतर झाले आहे. मात्र सध्याची उपजिल्हा रूग्णालयाची जागाही भिमा नदी किनारावरील परिसर असून भीमा नदीला पाणी सोडले की पुरस्थिती निर्माण होते सध्या मंजुर झालेले 200 खाटांचे रूग्णालय हे पंढरपूर शहराची वाढती लोकसंख्या व वाढता परिसर पाहता मध्यवर्ती ठिकाण म्हणून शासकीय विश्रामगृहासमोरील भिमा पाटबंधारेचे मोकळया जागेत सर्व सोयीयुक्त 200 खाटांचे सामान्य रूग्णालय बांधण्यात यावे, अशी आग्रही मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्याकडे पंढरपूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.
यावेळी कॉंग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष राजेश भादुले, ओबीसी सेलचे मा.जिल्हाध्यक्ष समीर कोळी यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.गोऱ्हे पंढरपूर दौऱ्यावर आल्या असता शासकीय विश्रामगृह येथे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
सध्या पंढरपूर शहराकडे येणारे सर्व रस्त्यांचे रूंदीकरण झाले आहे. पंढरपूर-आळंदी-मोहोळ हा राष्ट्रीय महामार्ग पंढरपूर तालुक्यातून गेलेला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीत वाढ होणार आहे. सध्या वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून सामान्य रूग्णालयात त्या अपघातग्रस्ताला सुविधा न मिळाल्यास त्याला थेट सोलापूरला सिव्हील हॉस्पिटलला जावे लागते ही गोष्ट आता नित्याचीच बनलेली आहे.
शासन नागरिकांसाठी सुविधा निर्माण करत असते मात्र ती योग्य ठिकाणी असल्यास त्याचा त्यांना चांगला फायदा होतो मात्र सध्याचे सामान्य रूग्णालय हे पंढरपूर शहरातील एका बाजूला आहे त्या ठिकाणी ये-जा करणेसाठी रिक्षाला सुमारे 100 ते 150 रूपये लागतात अशामुळे सर्वसामान्य नागरिक रूग्णालयाकडे जात नाही त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागात म्हणजेच शासकीय विश्रामगृहासमोरील भिमा पाटबंधारेचे मोकळया जागेत सर्व सोयीयुक्त 200 खाटांचे सामान्य रूग्णालय बांधण्यात यावे.
आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या चार यात्रांशिवाय वर्षातुन सुमारे 70 ते 80 लाख भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनाला येत असतात. येणाऱ्या भाविकांची संख्या व पंढरपूरची वाढती लोकसंख्या पाहता पंढरपूर येथे सुसज्ज असे रुग्णालय बांधण्यासाठी जागा निश्चित करून वाढीव निधी देवून शहराच्या विकासात भर पडेल अशी इमारत बांधण्यासाठी निधी मंजुर करावा अशी आग्रही मागणी पंढरपूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल पाटील यांनी केलेली आहे.