पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील समाजसेवक संजय ननवरे यांनी उघड उघड आ. समाधान अवताडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आ. अवताडे यांना मोठे राजकीय बळ मिळणार आहे. या बळाचा फायदा आ. अवताडे पुढील काळात नक्कीच करून घेतील, अशी शक्यता पंढरपूर नगरीत वर्तवली जात आहे.
समाधान ननवरे हे पंढरपूर शहरात समाजसेवक म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. दुसऱ्यांच्या गरजेला धावून जाणे, या त्यांच्या गुणामुळे त्यांची पंढरपूर नगरीत मोठी प्रसिद्धी झाली आहे. साहजिकच येथील नागरिक त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. दिवंगत आ. भारत भालके यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या संजय ननवरे यांनी, काही दिवसापासून आ. अवताडे यांच्याशी जवळीक वाढवली आहे. ननवरे यांच्या प्रेमाखातर आ.अवताडे यांनीही त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली होती. यावेळी पंढरपूरवासियांच्या भुवया उंचावल्या होत्या. आ. अवताडे यांच्या पंढरपूरमधील कार्यालयात ननवरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यामुळेच आ.अवताडे आणि संजय ननवरे यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाल्याचे दिसून येत आहे.
आ. समाधान अवताडे हे भाजपामधून आमदार झाले आहेत. निवडणुकीत त्यांना पंढरपूरचे मा. आ. प्रशांत परिचारक यांची मोठी साथ मिळाली होती. मध्यंतरीच्या काळात मंगळवेढा तालुक्यातील दामाजी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत परिचारक आणि भालके यांनी युती करत, आ. अवताडे यांच्या पॅनलचा पराभव केला होता.या पराभवाची चर्चा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पसरली होती.
दामाजी साखर कारखान्यातील पराभवापासून, परिचारक आणि आ. अवताडे यांचे संबंध पूर्वीइतके घट्ट राहिले नसल्याचे दिसून येत आहे.
परवा एमआयडीसी संदर्भातली पंढरपूरमधील पत्रकार परिषद आ. अवताडे यांनी स्वतःच घेतली. यावेळी परिचारकांचा मागमूसही नव्हता. पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक काही दिवसातच होणार आहे. या निवडणुकीत आ.
अवताडे स्वतंत्ररीत्या उतरणार काय ? याबाबतच्या चर्चांना पंढरीत ऊत आला आहे. ही निवडणूक लढवण्यासाठी संजय ननवरे यांच्यासारखे शिलेदार नक्कीच आ. अवताडे यांना फायद्याचे ठरणार आहेत. पंढरपूर शहरात आ. अवताडे यांचा गट पूर्वीपासूनच आहे. यात आता संजय ननवरे यांचे समाजकार्यही सामील झाले आहे. संजय ननवरे यांच्या या समाजकार्याचा फायदा आ. अवताडे यांना नक्कीच होणार असल्याचे दिसून येत आहे.