ग्राहक पंचायतीच्या मागणीला यश
पंढरपूर प्रतिनिधी
दरमहिन्याच्या तिसऱ्या सोमवारी प्रत्येक तालुका पातळीवर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी सोलापूर यांनी महापालिका आयुक्त, सर्व तहसीलदार यांना दिले असल्याची माहिती अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, समस्या, प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी शासनाने तालुका, जिल्हा,विभाग स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते.तथापी काही वर्षांपासून तालुका पातळीवरील लोकशाही दिनाचे आयोजन होत नव्हते त्यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी जिल्हा पातळीवर जावे लागत होते.नागरीकांना वेळ,आर्थिक झळ सोसावी लागत होती, याकडे ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे लक्ष वेधले.
अ.भा. ग्राहक पंचायतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तालुका पातळीवर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात यावे, त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक खातेप्रमुखाने उपस्थित राहून आपल्या विभागातील नागरिकांच्या समस्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. लोकशाही दिनाचे आयोजनाबद्दल पुर्वप्रसिध्दी देण्यात यावी तसेच कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहिती जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी दिली.