नवदुर्गा -७
संघर्षातून समाजसेवेचा वसा जपणाऱ्या - प्रमिलाताई
लेखक सचिन सरतापे म्हसवड
विहापूर ता.कडेगाव जि.सांगली येथील सौ.प्रमिला रंगराव महाडीक. तर माहेरचे नाव प्रमिला यशवंतराव खराडे. कराड येथे त्यांचे बालपण गेले. आज मागे वळून पाहताना सुख-दुःखाचे अनेक प्रसंग, संघर्षाचे दिवस, नात्यांची ऊब आणि समाजासाठी काहीतरी करण्याची मिळालेली प्रेरणा मनात दाटून येते. आयुष्याने अनेक परीक्षा घेतल्या; पण प्रत्येक संकटातून काहीतरी शिकत त्या पुढे जात राहिल्या. त्यांचे वडील लहानपणीच वारले. त्यामुळे आईवर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी येऊन पडली. आई, आणि दोन भाऊ असे चौघे जण स्वतंत्रपणे राहू लागले. परिस्थिती बेताची असली, तरी आईने शिक्षणात, संस्कारांत आणि शिस्तीच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासू दिली नाही. स्वावलंबी बनवण्यासाठी तिने शिवणकामाचे प्रशिक्षण घेण्याचीही व्यवस्था केली. तिचे कष्ट, त्याग आणि खंबीरपणा हेच आयुष्याचे पहिले विद्यापीठ ठरले.
बालपणातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे मोठे एकत्र कुटुंब. त्यांच्या वडिलांसह सहा चुलते आणि दोन आत्या असा मोठा परिवार होता. चौदा चुलत भावंडांच्या सहवासात बालपण आनंदात गेले. घरात सतत गप्पा, दंगामस्ती, हसणे-खेळणे आणि गोंधळ सुरू असे. त्या दिवसांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. एकीकडे मोठ्या कुटुंबाची माया, तर दुसरीकडे वडिलांच्या निधनानंतर आलेली जबाबदारी, अशा संमिश्र वातावरणात व्यक्तिमत्त्व घडत गेले.
शालेय शिक्षण चांगल्या वातावरणात झाले. शिक्षक अनुभवी आणि मार्गदर्शक होते. आईने दिलेली शिस्त, कुटुंबातून मिळालेले संस्कार आणि शिक्षणामुळे जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी विकसित झाली.
सन १९९० मध्ये विवाह झाला आणि प्रमिला खराडे या नावाची प्रमिला महाडीक झाले. विवाहानंतर नव्या संसाराची सुरुवात झाली. संसार म्हटला की सुख-दुःखाचे ऊन-पावसाचे खेळ आलेच; मात्र त्यांच्या वाट्याला आर्थिक चणचण आणि अनेक अडचणीही आल्या. प्रत्येक दिवस नव्या आव्हानांना सामोरे जाण्याचा होता.
या काळात परिस्थितीपुढे हार न मानता संसाराची जबाबदारी समर्थपणे पेलली. पतींची साथ आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत दोन मुलांचे संगोपन केले. सुखाचे दिवस सहज मिळाले नाहीत; त्यासाठी कष्टांची मोठी किंमत मोजावी लागली. संकटे आली, अडचणी उभ्या राहिल्या; पण जिद्द आणि संयमाच्या बळावर त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला.
आज वैवाहिक जीवनाची पस्तीस वर्षे पूर्ण करताना त्यांच्या मनात समाधानाची भावना आहे. मागे वळून पाहताना केलेल्या कष्टांचे चीज झाल्याचे जाणवते. आयुष्यातील संघर्षाने त्यांना खंबीर बनवले, तर अनुभवांनी माणसांना समजून घेण्याची दृष्टी दिली.संसार आणि शेती सांभाळतानाच मनात समाजसेवेची ओढ कायम राहिली. स्वतःच्या अडचणी अनुभवल्यामुळे इतरांच्या दुःखाची जाणीव अधिक तीव्रतेने होत गेली. विशेषतः गरजू, वंचित आणि निराधार महिलांच्या समस्या पाहिल्या की त्यांना मदतीचा हात द्यावा, असे मनापासून वाटत असे.
त्यांचे पती गावातील प्रतिष्ठित नागरिक असून रेशनिंग दुकान चालवतात. त्यांच्या माध्यमातूनही गरजू लोकांना सहकार्य करण्याची संधी मिळते. समाजातील अनेक महिलांना संकटाच्या काळात मदतीची गरज असते. अशा वेळी त्यांना धीर देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शक्य ते सहकार्य करणे, हे कर्तव्य मानतात.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गावात बचतगट चळवळ उभी करण्याच्या कामात पुढाकार घेतला. प्रमिलाताईंचा विहापूर येथील साई बचतगट म्हणजे केवळ पैशांची बचत नव्हे, तर महिलांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि एकजुटीची भावना निर्माण करणारे व्यासपीठ आहे. महिलांनी एकत्र यावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आपल्या हक्कांची जाणीव करून घ्यावी, ही भूमिका आहे.
त्या कडेगाव तालुका सेवादलाची पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. तसेच अग्रणी सोशल फौंडेशन, विटा या संस्थेची संघटिका म्हणून कडेगाव तालुक्यात काम करतात. या माध्यमातून वंचित घटकांपर्यंत पोहोचणे, महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, याला प्राधान्य देतात.
आज परिस्थिती पूर्वीपेक्षा स्थिर झाली आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांसाठी वेळ देणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि शक्य तेवढी मदत करणे, यासाठी अधिक वेळ देऊ शकतात. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवता आले, तर त्यापेक्षा मोठे समाधान दुसरे कोणते, असे वाटते.
प्रेरणास्थाने आणि जिव्हाळ्याच्या आठवणी
कडेगाव-पलूस तालुक्याच्या विकासासाठी योगदान देणारे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्याविषयी त्यांना विशेष आदर वाटतो. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेले काम प्रेरणादायी वाटते. हिंदी चित्रपटसृष्टीतील कसदार अभिनेत्री स्मिता पाटील याही आवडत्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.आयुष्यातील सर्वांत दुःखद क्षण म्हणजे त्यांच्या आईचे आणि सासूबाईंचे निधन. या दोघींचीही अपार माया लाभली. त्यांच्या प्रेमाची, मायेची आणि सहवासाची आठवण आजही मनाला हळवी करते. त्यांच्या आठवणी डोळ्यांत पाणी आणतात; पण त्याच वेळी त्यांनी दिलेले संस्कार जीवन जगण्याचे बळही देतात. त्यांच्या आजोबांचाही जीवनावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या विचारांतून आणि व्यक्तिमत्त्वातून जीवनाकडे पाहण्याची दिशा मिळाली.
सध्या समाजसेवेबरोबरच आध्यात्मिक संगतीत राहून जीवनाचा आनंद घेत आहेत. अध्यात्मामुळे मनाला शांतता मिळते, तर समाजसेवेमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो, अशी भावना आहे.आज त्यांना जीवनाकडे पाहताना संघर्षापेक्षा त्यातून मिळालेल्या शिकवणीचे मोल अधिक जाणवते. प्रतिकूल परिस्थितीने कणखर बनवले, आईच्या संस्कारांनी योग्य दिशा दिली आणि समाजातील माणसांच्या सहवासाने सेवाभाव अधिक दृढ केला.
जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत वंचित, गरजू आणि निराधार घटकांच्या मदतीसाठी कार्यरत राहावे. समाजातील दुःख कमी करण्यासाठी आपल्याला जेवढे शक्य आहे, तेवढे योगदान द्यावे. कारण माणसाचे मोठेपण त्याच्याकडे किती संपत्ती आहे यावर नव्हे, तर त्याच्या हातून किती माणसांचे जीवन सुसह्य झाले यावर ठरते.
आयुष्याच्या वाटेवर काटे आले, वादळे आली; पण त्यातूनच अनुभवांची शिदोरी मिळाली. आज संसारातील समाधान, कुटुंबाची साथ, आध्यात्मिक शांतता आणि समाजसेवेचे समाधान यांमुळे आनंदी आहेत. उरलेले आयुष्यही माणुसकीचा दिवा तेवत ठेवत, इतरांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी समर्पित करायचे आहे. हाच जीवनप्रवासाचा खरा सार्थ अभिमान आहे.

