मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार पत्रकारितेत प्रतिष्ठेचे समजले जातात. पुरस्कार्थींची निवड तटस्थपणे करून पत्रकारितेत भरीव काम करणाऱ्या पत्रकारांचा यथार्थ गौरव करण्याची परंपरा परिषदेनं सांभाळली आहे. बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराबरोबरच अन्य अकरा पुरस्कार दरवर्षी दिले जातात.आरोग्य पत्रकारिता, कृषी पत्रकारिता, शोध पत्रकारिता, डिजिटल पत्रकारितेत अशी विविध क्षेत्रं असतात.
परिषदेची एक निवड समिती असते, ती पुरस्कारांची निवड करते. आलेल्या नावांची कार्यकारिणीत चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जातो.पुरस्काराचे नाव ठरल्यानंतर संबंधित पत्रकाराची परवानगी घेऊन नावं घोषित केली जातात.पुरस्कारासाठी अर्ज मागविले जात नाहीत.
अर्ज करून पुरस्कार मिळविण्यात आनंद नसतो. आपल्या कार्याची अनपेक्षितपणे कोणी दखल घेते या सारखा आनंद दुसरा नसतो. ही पध्दत आहे..आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की, परिषदेने जाहीर केलेल्या एकाही नावाबद्दल कधी कोणी आक्षेप घेतला नाही, किंवा वाद झाला नाही.त्यामुळं पुढच्या पुरस्कारांचे मानकरी कोण असतील हा पत्रकारिता क्षेत्रात उत्सुकतेचा, चर्चेचा विषय असतो.यंदाच्या पुरस्कार्थींची नावं अशीच दमदार होती.
हेमंत देसाई यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमात आपल्या सक्षम लेखणी आणि वाणीचा ठसा उमटवून सामाजिक जबाबदारीतून त्यांनी पत्रकारिता केली.आपली मतं कायम स्पष्ट आणि निर्भीडपणे मांडली.त्यामुळे एखाद्या प्रचलित विषयावर हेमंत देसाई काय बोलतात, लिहितात याकडे सत्ताधारी आणि विरोधकांची लक्ष असते. त्यांनी महाराष्ट्रात आपला मोठा वाचक वर्ग निर्माण केला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय परिषदेनं घेतला.
डिजिटल मिडियात आपला वेगळा ठसा निर्माण करून डिजिटल मिडियाला विश्वासार्हतेचे परिमाण मिळवून देणारे प्रशांत कदम यांना आचार्य अत्रे पुरस्काराने गौरविण्यात आले.
जान्हवी मुळे यांनी इलेक्ट्रिक आणि डिजिटल मिडियात भरीव कामगिरी बजावत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे त्यांना सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले.
अनुराग त्रिपाठी. हा हिंदी पत्रकारितेतील लोकमान्य चेहरा. दीर्घकाळ नवभारत टाइम्समध्ये त्यांनी पत्रकारिता केली. बाबुराव पराडकर हिंदी पत्रकारिता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
सचिन परब यांना दत्ताजीराव तटकरे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.इटीवही मराठीचे संपादक म्हणून त्यांनी केलेल्या पत्रकारितेची दखल परिषदेनं घेतली.
पत्रकारांना सर्वात जास्त गरज असते आरोग्य सेवेची . पत्रकारांची ही गरज ओळखून संतोष आंधळे यांनी हे क्षेत्र निवडले आणि अनेक गरजू पत्रकारांना त्यांनी मदत केली, मदत मिळवून दिली. त्याबद्दल त्यांना मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आलं.
सुनील पाटील हे कोल्हापूर सकाळचे पत्रकार शेतकऱ्यांना वाचतं करण्याचं आणि त्यांच्या समस्या सरकारच्या काणी घालण्याचं काम सुनील पाटील यांनी लेखणीच्या माध्यमातून केल्याबद्दल त्यांना स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख देवडीकर पुरस्कार दिला गेला.
बापुसाहेब जाधव म्हटलं की, साताऱ्याचे ग्रामोध्दार आठवतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि स्पर्धेला तोंड देत त्यांनी ग्रामोध्दार चालविला आणि साताऱ्यात नव्या दमाच्या पत्रकारांची एक फळी निर्माण केली.त्याच्या पन्नास वर्षांच्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना संतोष पवार स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.हे सर्व पत्रकार आले, त्यांनी आमचा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.
परिषदेचा कोणताही कार्यक्रम असला की,विरोधक खडबडून जागे होतात,कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी अफवा पसरवत राहतात, नियोजित प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमास येऊ नये म्हणून प्रयत्न करतात.. यावेळेसही हे प्रयोग झाले. तरीही आणि कोणत्याही अपप्रचारास भीक न घालता शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे कार्यक्रमास आले, दोन तास थांबले, छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल उध्दव साहेबांचे मनापासून आभार मानले.
परिषद आणि ठाकरे घराण्याचे जुने स्नेहबंध आहे.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे परिषदेचे सदस्य होते, परिषदेच्या मतदान प्रक्रियेत ते भाग घ्यायचे. परिषदेच्या दोन कार्यक्रमांनाही ते उपस्थितही होते.दहा वर्षांपुर्वी स्वतः उध्दव ठाकरे देखील ठाण्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित होते. तेव्हा दिनू रणदिवे यांना 99 हजारांची थैली अर्पण करून त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कार्यक्रम परिषदेच्या प्रतिष्ठेला साजेसा अप्रतिम आणि नेटका झाला. तो यशस्वी करणयासाठी " टीम मुंबई" आणि राज्यातील शेकडो पत्रकारांनी प्रयत्न केले.दिवाळी अंकाची कामं सुरू आहेत,
नवरात्र आहे तरीही रिकाम्या खुर्च्यांचे फोटो व्हायरल करण्याची संधी आमच्या परममित्रांना मिळाली नाही याबद्दल मात्र वाईट वाटतंय असो.सर्वांचे मनापासून आभार एस एम देशमुख यांनी मानले.

