नवदुर्गा :६
संघर्षाच्या भट्टीत तेजाळलेले बावनकशी सोने - सुनीताताईं
लेखक सचिन सरतापे म्हसवड
सौ. सुनीता राजेंद्र कदम(माहेरचे नाव सुनीता तानाजी धनवडे) "वादळातही जे डगमगत नाहीत, तेच इतिहासाच्या पानांवर सुवर्णअक्षरांनी आपले नाव कोरतात. जिद्द आणि स्वाभिमान असेल तर आयुष्यातील कठीण प्रसंगांवर मात करून यशाची शिखरे गाठता येतात."
आयुष्याच्या वळणावर मागे वळून पाहताना सौ. सुनीता राजेंद्र कदम यांच्या जीवनप्रवासातून एकाच गोष्टीची जाणीव होते—आयुष्य ही एक निरंतर चालणारी संघर्षगाथा आहे. निसर्गाने किंवा परिस्थितीने कितीही वादळे समोर आणली, तरी ज्यांच्या मनात जिद्द आणि पंखात बळ असते, ती माणसे कधीही हार मानत नाहीत. 'जिथे इच्छा तिथे मार्ग' या म्हणीप्रमाणे त्यांनीदेखील आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाशी दोन हात करत आज समाजात स्वाभिमानाने आपले स्थान निर्माण केले आहे.
सौ. सुनीता कदम यांचा जन्म १९८४ साली सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे एका अत्यंत प्रतिष्ठित आणि देशभक्त कुटुंबात झाला. त्यांचे माहेर स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंब म्हणून परिसरात नावाजलेले होते. घरात धार्मिक, सामाजिक आणि शिस्तबद्ध वातावरण होते. कौटुंबिक व आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे बालपणात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही. शेतामळ्यात राहणे, निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे वावरणे आणि भावंडांसोबत मौजमजा करण्यात त्यांचे बालपण अत्यंत आनंदाने गेले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण शेळकबाव येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवी 'रयत शिक्षण संस्था, भाळवणी' आणि नववी ते दहावी ' डोंगराई शिक्षण संस्था, शेळकबाव' येथे त्यांनी पूर्ण केले. शालेय वयात अभ्यासासोबतच त्यांना वक्तृत्वाची अत्यंत आवड होती. शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत नेहमी प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी शालेय व्यासपीठ गाजवले. इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्यांनी संपूर्ण शाळेत तिसरा क्रमांक पटकावला होता. 'पेरावे तसे उगवते' या उक्तीप्रमाणे त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. पुढे शिकण्याची त्यांची तीव्र इच्छा होती, पण काही अपरिहार्य कारणांमुळे शिक्षणाचा तो धागा तिथेच तुटला.
सन २००२ मध्ये त्यांचा विवाह सौ. सुनीता राजेंद्र कदम म्हणून झाला. परंतु, सन २००२ हा त्यांच्या आयुष्यातील 'काळा दिवस' ठरला. स्वतःच्या इच्छा, अपेक्षा आणि स्वप्ने बाजूला ठेवून त्या लग्नाला तयार झाल्या; परंतु त्यांचे लग्न एका चुकीच्या ठिकाणी झाले. लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळले.
२००२ ते २०१७ ही १५ वर्षे म्हणजे त्यांच्या सहनशीलतेची आणि सोशीकतेची पराकाष्ठा होती. या काळात त्यांनी एका मुलीला आणि एका मुलाला जन्म दिला. स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी त्या सर्व काही मूकपणे सहन करत राहिल्या. डोळ्यातून अश्रूंचे पाट वाहत असतानाही त्यांनी संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, 'दिव्याखाली अंधार' असावा तशी त्यांची अवस्था झाली होती.
२०१८ मध्ये त्यांच्या आयुष्याने एक अतिशय महत्त्वाचे आणि क्रांतिकारी वळण घेतले. सातत्याने होणारा त्रास आणि अन्यायाविरुद्ध त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या सासर सोडून माहेरी भाळवणी येथे परत आल्या. 'स्वतःच्या पायावर उभे राहणे' हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर होता. कोणावरही भार न बनता स्वतःच्या हिमतीवर जगायचे असा खंबीर निर्धार त्यांनी केला.
त्यानंतर त्यांनी 'उमेद' अभियानाअंतर्गत C.R.P. म्हणून समाजकार्यात पाऊल ठेवले. महिलांचे बचत गट स्थापन करणे, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँक कर्ज प्रकरणे मार्गी लावणे, गावात मोफत आरोग्य शिबिरे राबवणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील गरजू महिलांपर्यंत पोहोचवणे हे कार्य त्यांनी अत्यंत निष्ठेने सुरू केले.
कष्टाचे फळ नेहमी गोड असते. त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर आपली स्वप्ने पूर्ण केली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या दोन्ही मुलांना उत्तम संस्कार देऊन घडवले. आज त्यांच्या मुलांच्या प्रगतीमध्येच त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले आहे. आज त्या समाजात मान-सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगत आहेत.सुनिताताईंना महान राष्ट्रीय नेते म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी तर चित्रपट अभिनेते अजय देवगण हे आवडतात.
तर त्यांचा आवडता चित्रपट दिल का रिश्ता हा असून त्यांचा छंद हा समाजसेवा आहे. याच माध्यमातून महिला सक्षमीकरणामध्ये मोठे योगदान त्यांनी दिले आहे.याचीच दखल घेऊन त्यांना कडेगांव पंचायत समितीने शेळकबाव गावांमध्ये C.R.P. (उमेद अभियान)या पदावर नियुक्ती करून ते स्थानिक बचत गटांचे काम पाहत आहेत.या अंतर्गत महिला बचत गट, कर्ज प्रकरणे व आरोग्य शिबिरे इतर दुःखी व पीडित महिलांना स्वावलंबी बनवणे व स्वामी कृपेने जीवन समृद्ध करून मनस्वी समाधान मिळत आहे.
इतर महिलांना संदेश देताना त्या म्हणतात की, संकटे कितीही मोठी असोत, 'अडचणींवर मात करून पुढे जाणे' हाच खरा स्त्रीशक्तीचा बाणा आहे. स्त्रियांनी कधीही स्वतःला अबला मानू नये. अडचणींचा काळ सोडून द्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. त्यांना ज्या श्री स्वामी समर्थांनी आधार दिला, त्यांची कृपा त्यांच्यावर अशीच राहो आणि त्यांच्याकडून सदैव जनसेवा घडो, हीच भावना त्या व्यक्त करतात.

