पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथे लोहार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पंढरपूर येथे दि. २ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीने सांगता झाली. पालकमंत्री गोरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते दादा कळसाईत यांच्यासह लोहार समाज बांधवांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी समाज बांधवांनी शेतीपूरक अवजारांवरील जीएसटी माफ करणे, लोहार समाजाच्या प्रतिनिधींची आर्थिक विकास महामंडळावर नियुक्ती करणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर लोहार समाजासाठी व्याज परतावा योजना लागू करणे, तसेच शासनाच्या जिल्हास्तरीय समित्यांवर समाजाच्या प्रतिनिधींना काम करण्याची संधी देणे, अशा विविध मागण्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.
या मागण्यांबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. आचारसंहिता संपल्यानंतर काही दिवसांतच लोहार समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच समाजाच्या प्रतिनिधींना स्थानिक समित्यांवर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासह इतर मागण्याही शासन दरबारी मांडून सकारात्मक निर्णयासाठी तातडीने पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर लोहार समाज बांधवांनी आमरण उपोषण स्थगित केले. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनस्तरावर निश्चितपणे पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजप नेते हरीभाऊ गावधंरे, बालाजी लोहार, महेश लोहार, स्नेहा लोहार, महादेव लोहार, अर्जुन आप्पा टीगंरे, विजय पवार, अक्षय लोहार, भाजप नेते लक्ष्मणराव धनवडे, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती शुभम आगवणे, माऊली हळणवर, ॲडिशनल एसपी प्रेरणा कट्टे, तहसीलदार सचिन लंगोटे, पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक ढवाण, लोहार समाजाचे प्रतिनिधी अनिल वसव यांच्यासह लोहार समाज बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


